नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
’बँक आपल्या दारी’ हे ब्रिदवाक्य समोर ठेऊन भारतीय डाक विभागाने 1 सप्टेंबर 2018 रोजी ’इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’ची स्थापना केली होती. या बँकेअंतर्गत भारतातील सर्व टपाल कार्यालये टपाल सेवे बरोबरच बँकेचीसुद्धा सुविधा पुरविणार आहेत. जगातील सर्वात मोठे टपाल जाळे भारतात असल्याने देशातील प्रत्येक गावापर्यंत, घरापर्यंत डाक विभाग पोहचलेला आहे. या सर्वदूर जाळ्याचा उपयोग बँक सेवा पुरविण्याचा भारत सरकारचा मानस असून त्या दृष्टीने डाक विभाग नव्या रूपात समोर आलेला आहे. इंडिया पोष्ट बँकेमुळे गावातील पोस्टमन ही एक चालती फिरती बँक असून घरपोच बँकींग सेवा देणे त्यामुळे डाक विभागास शक्य झाले आहे. याच योजने अंतर्गत नवी मुंबई डाक विभागाद्वारा गुरुवारी (दि. 2)व शुक्रवारी (दि. 3) दुपारपर्यंत तब्बल 8824 पेक्षा जास्त बँक खाती पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक व डाक सहाय्यक कर्मचार्यांच्या मदतीने उघडण्यात आली. नवी मुंबई डाक विभागाच्या अंतर्गत येणार्या पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, ठाणे तालुक्यातील तसेच नवी मुंबईतील 131 टपाल कार्यालयाचे कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी नवी मुंबई विभागाचे वरीष्ठ अधिक्षक डॉ. अभिजीत इचके यांचे मार्गदर्शन लाभले.इंडीया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता नसून फक्त आधार क्रमांक आणि बोटाचा ठसा देऊन तीन ते चार मिनिटांमध्ये खाते उघडले जाते. बँकेने मोबाईल बँकींगची सुविधा विनाशुल्क दिलेली असून मोबाईलमध्ये बँकेचे अॅप डाउनलोड करून मोबाईल बँकींग, ऑनलाईन बिल पेमेंट्स, फंड ट्रान्सफर या सुविधांचा लाभ घेता येतो. पोस्ट ऑफीस बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, आरडी यांचे हप्ते या मोबाईल अॅपमधून जमा करता येतात. पोस्टमनद्वारे घरपोच बँकेचे पैसे काढू किंवा टाकू शकता. बँकेचा व्याजदर वार्षिक चार टक्के असा आकर्षक आहे. टपाल खात्याची विश्वसनीयता आणि आकर्षक व्याजदर यामुळे नवी मुंबईमधील नागरीक परत डाक विभागाकडे वळले असून विविध योजनांचा लाभ घेत आहेत.