कळंबोली : प्रतिनिधी – खांदा काँलनीमधील पाणी वाहून नेणारा बाळोग्राम जवळील नाला सफाई करण्याचे काम यावर्षी सिडकोने काढले नसल्याने खांदा कॉलनी शहर पाण्याखाली जावून नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. याला सर्वस्वी सिडको प्रशासनाला जबाबदार धरण्यात येवून त्यांच्याकडून नुकसान भरपाई करण्यात यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरसेविका कुसुम पाटील यांनी दिली आहे.
त्यांनी सिडकोला लेखी निवेदन देवून खांदा कॉलनी सेक्टर 10,11 व 13 मधील पावसाचे पाणी वाहून नेण्याचे काम बाळोग्राम जवळील कच्चा नाल्यामार्फत होत आहे. दरवर्षी या नाल्याची साफसफाई पावसाळ्यापुर्वी केली जाते पण यावर्षी जाणूनबुजून या नाला सफाईची निविदाच काढण्यात आली नाही असे खात्रिशीर समजते. तेव्हा खांदा कॉलनीतील पावसाचे पाणी मुख्य नाल्यापर्यंत वाहून नेणार्या कच्या नाल्याची निविदा काढून लवकरात लवकर सफाई करण्यात यावी.
अन्यथा खांदा कॉलनी पाण्याखाली जावून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल व याला सर्वस्वी सिडको अधिकारी जबाबदार असतील आणि यांच्याकडूनच नुकसानीची भरपाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. यावर्षीची मान्सुनपुर्व कामे थुकपट्टी लावून करण्यात आल्याने येथील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.