आ. महेश बालदी यांनी वेधले सिडकोचे लक्ष; कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी
पनवेल : बातमीदार : करंजाडे नोडमधील उंच भागात असलेल्या इमारतींमध्ये सिडकोचे पाणी आवश्यक दाबाने पोहचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाई सहन करावी लागते. सिडकोने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यासंदर्भात आमदार महेश बालदी यांनी सिडकोचे लक्ष वेधले आहे.
पनवेल शहराला लागून असलेल्या सिडकोच्या करंजाडे नोडमध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. अनेक सेक्टरमध्ये विभागल्या गेलेल्या या भागात सेक्टर दोन आणि सेक्टर सहा हे भाग उंचावर आहेत. त्यामुळे येथे पाणी पोहचणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे ठरत आहे. चार ते पाच वर्षांत नागरिक मोठ्या संख्येने या भागात राहायला जात आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीने पाइपलाइन दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतल्यानंतर या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होतात. अन्य ठिकाणी दोन दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत होत असताना या भागात मात्र दोन आठवडे लागतात. शटडाऊन केल्यानंतर पाणीपुरवठा लगेचच मोठ्या दाबाने सोडला जात नाही. हळूहळू दाब वाढविला जातो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन आठवडे लागतात. या काळात नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते.
काही नागरिक मोटर लावून पाणी खेचत असल्यामुळे अन्य नागरिकांना पाणी पुरत नाही. करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स असोसिएशनकडून सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. सोसायट्यांनी सिडकोकडे लेखी अर्ज देऊन या पाणीटंचाईवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे, मात्र सिडकोने याबाबत तातडीने पावले उचलली नसल्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्याकडे ही समस्या मांडून सिडकोचे लक्ष वेधण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार आमदार बालदी यांनी कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी सिडकोकडे पाठपुरावा केला.
पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी या भागातून मोठ्या प्रमाणात नाहीत. एखाद्या भूखंडावर पाणीपुरवठा सुरळीत होत नसेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या शटडाऊनमुळे सगळीकडे पाणीपुरवठा कमी दाबाने होतो. तरीदेखील 400 मिमी. व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे कंत्राट तांत्रिक प्रक्रियेत आहे. नवीन पाइपलाइन टाकली की पाणीटंचाई दूर होईल. – राहुल सरवदे, इंजिनीअर, पाणीपुरवठा विभाग, नवीन पनवेल
RamPrahar – The Panvel Daily Paper