Breaking News

आश्रमशाळेतील मुलीकडून विष प्राशन; कर्जत भालीवडी येथील घटना

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी

तालुक्यातील भालीवडी येथील शासकीय आश्रमशाळेत आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीने रविवारी (दि. 9)  विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थिनीवर कळंबोली (ता. पनवेल) येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या तिची प्रकृती स्थीर आहे.

कर्जत तालुक्यातील भालीवडी येथील शासकीय आदिवासी आश्रामशाळेत नीरा भिवा चौधरी (रा. धोदाणीवाडी, ता. पनवेल) ही विद्यार्थीनी आठवी इयतेत शिकत आहे. तिने रविवारी सायंकाळी फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शाळेतील कर्मचार्‍यांनी तिला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे रुग्णालय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी प्राथमिक उपचार करून तिला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात येथे हलविण्याचा निर्णय घेतला. कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन या विद्यार्थीनीच्या प्रकृतीची चौकशी केली.

 नीरा चौधरी हिला भेटण्यासाठी रविवारी दुपारी एक तरुण भालीवडी आश्रमशाळेत आला होता. त्याने सोबत काही खाद्यपदार्थ आणले होते. ही बाब आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी पाहिली. त्यांनी  नीरा चौधरीला दटावले. त्यामुळे सायंकाळी नीराने स्वच्छता गृहात जावून फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र आपले वडील भेटायला आले नाहीत, म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे नीराने सांगितले असल्याची माहिती मुख्याध्यापिका सुशीला भोई यांनी दिली.

दरम्यान, पेण तालुक्यातील वरसई आश्रमशाळेतील विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची याच आठवड्यातील घटना लक्षात घेता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी भालीवडी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सुशिला भोई आणि आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आहे.

आश्रमशाळा आम्हांला चुकीची माहिती देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणी एक चौकशी समिती नेमून त्रयस्थपणे चौकशी करावी.

-जैतु पारधी, माजी अध्यक्ष,

आदिवासी संघटना, कर्जत

आमच्या शासकीय आश्रमशाळेमधील नीरा चौधरी या मुलीचे आईवडील तिला भेटायला येणार होते, तसा निरोप आला होता. मात्र त्यांच्यापैकी कोणी भेटायला आले नाहीत, म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे त्या मुलीने आम्हाला सांगितले आहे.

-सुशिला भोई, मुख्याध्यापिका

भालीवडी आश्रमशाळेतील मुलीवर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात पाठवले आहे.-डॉ. मनोज बनसोडे, अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कर्जत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply