Breaking News

खालापूर तालुका प्लास्टिक कॅरी बॅगमुक्त करण्याचा संकल्प

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त खालापूर तहसील कार्यालय व सहज सेवा फाउंडेशन यांच्या कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याच्या संकल्प प्रयोगाचा शुभारंभ सोमवारी (दि. 15) खालापुरातील सरनौबत नेताजी पालकर सभागृहात कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर सुरू होेत असलेला कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम भविष्यात मैलाचा दगड ठरेल. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपला तालुका प्लास्टिक कॅरी बॅगमुक्त करण्याच्या दिशेने पाऊल उचलून आझादीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील नवीन संकल्प यशस्वी करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नैराळे यांनी या वेळी केले. प्रशासकीय अधिकारी व व्यापारी असोसिएशन यांच्या सहकार्याने तसेच एनजीओ व नागरिक यांच्यामार्फत हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर खालापूर तालुक्यात राबविण्यात येणार असून या उपक्रमाचे महत्त्व समजून घेऊन नागरिक नक्कीच या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देतील, असा विश्वास तहसीलदार आयुब तांबोळी यांनी व्यक्त केला. खालापूरचे नायब तहसीलदार राजश्री जोगी, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र फक्के, साजगाव विभागाचे तलाठी भरत सावंत, उद्योजक हरीश काळे, उद्योजक राजेश पाटील यांच्यासह तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी भालेराव यांनी केले. या वेळी उपविभागीय अधिकारी नैराळे यांच्या हस्ते सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले.तहसील कार्यालय व सहज सेवा फाउंडेशनने खालापूर तहसील कार्यलय परिसरात स्वतंत्र भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या माहितीचे बॅनर्स उभारले आहेत. त्याचे अजित नैराळे व  नागरिकांनी भरभरून कौतुक केले. विशाल उशिरे यांनी आभार मानले. कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशीका शेलार, सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, महिला संघटक नीलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुळकर्णी, आयुब खान आदि परिश्रम घेत आहेत.

कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा उपक्रम

खालापूर तहसील कार्यालय व सहज सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दुकानांमध्ये कापडी पिशव्या पुरवल्या जातील. ग्राहक संबंधित दुकानदाराकडून डिपॉझिट तत्त्वावर अल्प दरात कापडी बॅग घेऊ शकतात व वापरानंतर तीच बॅग पुन्हा तालुक्यातील कलेक्शन सेंटरमध्ये परत देऊ शकतात. यातून दुकानदारा मार्फत होणारा प्लास्टिकच्या कॅरी बॅगचा वापर कमी होईल तसेच घरून बॅग न आणल्यास अथवा बॅग हवी असल्यास गिर्‍हाईकावरसुद्धा कुठल्याही प्रकारचा बोजा पडू नये अशा प्रकारची ही संकल्पना आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply