नवी मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबईकरांना गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या महत्त्वाच्या कामासाठी ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत असे. त्यामुळे अनेकांना त्रास होत होता. या अनुषंगाने वाशीतील पोस्ट कार्यालयाच्या इमारतीमध्ये पासपोर्ट विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी नवी मुंबईकरांची होणारी पायपीट यापुढे थांबणार आहे. नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक प्रक्रियेकरिता ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. यामध्ये त्यांचा वेळही वाया जात होता, शिवाय प्रवासभाड्यात खिशाला झळही बसायची. त्यामुळे नवी मुंबईत स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. अनेक वर्षांपासून जागेअभावी ही मागणी पूर्ण होऊ शकली नव्हती. मागील दीड वर्षापासून पासपोर्ट विभागाकडून कार्यालयासाठी स्वतंत्र जागेचा शोध सुरू होता. अखेर वाशीतील पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालयासाठी जागा उपलब्ध झाली आहे. यानुसार रविवारी (10 मार्च) त्या ठिकाणच्या नव्या पासपोर्ट कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. सद्यस्थितीला नवी मुंबईसह पनवेलकरांना पासपोर्टसंबंधीच्या कामासाठी ठाणे अथवा मुंबईला जावे लागत आहे. यामध्ये नागरिकांचा कार्यालयीन प्रक्रियेपेक्षा सर्वाधिक वेळ प्रवासातच जात आहे. वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होताना दिसून येत आहे. यामुळे वाशीत नवे पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper