Breaking News

कर्नाळा बँकेच्या खातेदारांनी आता गळफास घ्यावा का?

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सरकारला सवाल

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँक आर्थिक घोटाळ्यामुळे हजारो खातेदार आणि ठेवीदार चिंतेत असतानाही सहकार खाते त्यांचा अंत पाहत आहे. अशा वेळी या खातेदार, ठेवीदारांनी गळफास घेऊन जीव द्यावा का, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत उपस्थित केला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात चर्चा करताना आमदार ठाकूर यांनी कर्नाळा बँक घोटाळा आणि त्यामुळे ठेवीदार व खातेदारांचे झालेले हाल यावर अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत सरकारने या विषयावर दुर्लक्ष करू नये, अशी सूचना व मागणी केली.
आमदार प्रशांत ठाकूर सभागृहात म्हणाले की, रायगड जिल्ह्यात गोरेगाव बँक, रोहा अष्टमी बँक, पेण अर्बन बँक, सिद्धिविनायक बँक बुडाली. आता माझ्या पनवेल तालुक्यातील 61 हजार खातेदार असलेली कर्नाळा नागरी सहकारी बँक ही तशाच पद्धतीने वाटचाल करीत आहे. 63 बेनामी कर्ज खात्यांतून 512 कोटी रुपये कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी लंपास केले, मात्र सहकार खाते कारवाई करीत नाही. यावर लक्ष ठेवण्याची आणि खोलवर तपास करण्याची आवश्यकता आहे, हे या बँकेच्या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एप्रिल 2019मध्ये सहकार खात्याच्या लक्षात आणून दिले आणि स्पेशल ऑडिटर नेमण्याची सूचना करण्यात आली, मात्र स्पेशल ऑडिट नोव्हेंबर 2019मध्ये झाले. त्या ऑडिटमध्ये सप्टेंबर 2019मध्ये 107 कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवले आहेत, असा स्पष्ट खुलासा झाला. सहकार खात्याने वेळीच जर या ठिकाणी तपासणी केली असती, तर किमान ठेवीदारांचे हे 107 कोटी रुपये वाचू शकले असते, पण सहकार खाते अजूनही यावर काहीही करीत नाही. आता प्रशासक नेमला गेला आहे, पण ठेवीदारांना प्रशासकाच्या माध्यमातून खातेदारांना आश्वस्त केले जाऊ शकते, असे एका ओळीचेही प्रसिद्धीपत्रक अजूनपर्यंत निघाले नाही. मग अशा परिस्थितीत ठेवीदारांनी करायचे काय? आपला जीव द्यायचा का, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात उपस्थित केला.
सहकार खात्याने जागरूकपणे काम करीत सर्वसामान्य लोकांच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे, पण सहकार खाते ठेवीदार, खातेदारांचा अंत पाहत आहे असे निदर्शनास आणून ठेवीदार व खातेदारांचे पैसे त्यांना परत मिळावेत, यासाठी शासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी या वेळी केली.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply