Breaking News

कडेकोट बंदोबस्त

कोरोनाच्या भीतीचे सावट इतके गडद आहे की देशातील अनेक भागांत अक्षरश: टाळेबंदीसारखी परिस्थिती नजीकच्या काळात ओढवेल असे वाटते. परंतु त्याला काही इलाज देखील नाही. या घातक विषाणूने जगाचीच अर्थव्यवस्था हादरवून टाकली असून त्याचा काही प्रमाणात फटका भारताला देखील बसेल. परंतु ‘जान है तो जहान है’ या उक्तीनुसार हे नुकसान सहन करायला हवे.

कोरोना विषाणूशी सार्‍या जगाचा जीवनमरणाचा संघर्ष सुरू आहे. हा घातक विषाणू भारतात देखील शिरकाव साधून थैमान घालण्याच्या पवित्र्यात आहे. जगातील 121 देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली असून चीन आणि इटलीमध्ये सर्वाधिक रुग्ण दगावले आहेत. अपेक्षेप्रमाणेच परदेशातून आलेल्या काही भारतीय नागरिकांच्या मार्फत हा विषाणू अखेर भारतात शिरला. गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 76वर पोहोचली असून कर्नाटकातील कलबुर्गी येथील एका वृद्धाचा मृत्यू ओढवला आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढणे साहजिक असले तरी त्यास घाबरून जाण्याचे काही कारण नाही. एच1एन1 किंवा निपा विषाणूपेक्षा कोरोनाचा घात दर (मॉर्टॅलिटी रेट) खूपच कमी आहे. एच1एन1 किंवा निपामुळे 35 ते 50 टक्के रुग्ण दगावले होते. कोरोना विषाणूचा मृत्यूदर अवघा 3 ते 5 टक्के इतकाच आहे. या विषाणूबद्दल चुकीची माहिती सोशल मीडियातून पसरल्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. अर्थात असे असले तरी काळजी मात्र घ्यायलाच हवी. चीनमधील ज्या वुहान शहरात या विषाणूचा उद्भव झाला, त्या शहर आणि परिसराला चीनी सरकारने अक्षरश: कडेकोट बंदोबस्तात ठेवले आणि विषाणूचा फैलाव यशस्वीरित्या रोखला. हवेतून वेगाने पसरणार्‍या या विषाणूला रोखण्याचा सध्यातरी हा एकच मार्ग दिसतो. कारण या विषाणू बाधेवर ठराविक असा उपचार करता येत नाही. केरळ, राजस्थान, दिल्ली या राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील शहरी भागातही अशा प्रकारे बंदोबस्त वाढवण्याची नितांत गरज आहे. केंद्र सरकारने या संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली असून संबंधित राज्यांना ती धाडण्यात आली आहेत. त्यानुसार पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव आणि अन्य गर्दीची काही ठिकाणे शुक्रवारी मध्यरात्रीपासून तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना विषाणूविरोधातल्या सरकारी तयारीची माहिती दिली. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील तसेच मुंबई आणि नवी मुंबई येथील काही शाळा तूर्त बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. मुलांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अगदीच तोंडावर आलेला आयपीएल क्रिकेट सोहळा हा भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. परंतु कोरोना विषाणूमुळे ढवळून निघालेल्या वातावरणात असे गर्दीचे सोहोळे साजरे करणे आत्मघात ठरेल. म्हणूनच प्रेक्षकांविना आयपीएलचे सामने खेळवण्याचा आयोजक विचार करत आहेत. आयपीएल हा सोहळा क्रिकेटचा असला तरी त्यात खेळ कमी आणि व्यवसायच अधिक असतो. आयपीएलमध्ये मिळणार्‍या पैशातील सर्वात मोठा वाटा असतो टीव्ही प्रक्षेपण आणि जाहिरातींचा. त्यामुळे स्टेडियममधील गर्दी रोखली तरी आयपीएलच्या आयोजकांचे फारसे बिघडणार नाही. यंदा होणारे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मात्र कोरोनाच्या भीतीमुळे लांबणीवर टाकण्यात आले आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply