Breaking News

अखेर न्याय झाला!

निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील चारही आरोपींना शुक्रवारी (दि. 20) पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आले. मुकेश सिंग (वय 32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंग (31) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे उशिराने का होइना पण निर्भयाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. अत्याचारानंतर या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तसेच पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आले, मात्र 29 डिसेंबरला निर्भयाचा मृत्यू झाला. दरम्यान, निर्भयाला न्याय मिळावा यासाठी देशात नागरिक एकवटले आणि या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. 2013च्या मार्च महिन्यात सहापैकी पाच आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. हायकोर्टाने 2014मध्ये या आरोपींची फाशी कायम ठेवली. पुढे मे 2017मध्ये सुप्रीम कोर्टानेही ही फाशी कायम ठेवली. ट्रायल सुरू असतानाच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली, तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती.
अखेर सात वर्षांनंतर निर्भयाच्या चारही दोषींना तिहार तुरुंगात जल्लाद पवन यांनी फाशी दिली. एकाच वेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना आहे. दोषींना फाशीची शिक्षा मिळाल्यानंतर देशभरातून समाधान व्यक्त होत आहे.
या खटल्यात अ‍ॅड. सीमा कुशवाह यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. विशेष म्हणजे  त्यांनी शुल्क घेतले नाही.
न्याय जिंकला -पंतप्रधान मोदी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ‘न्याय जिंकला! महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाचे असून महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षेची काळजी घेण्याला प्राधान्य असायला हवे, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे नमूद केले. आमच्या नारीशक्तीने प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एकत्रितपणे आम्हाला असे राष्ट्र निर्माण करावे लागेल जेथे महिला सशक्तीकरणावर लक्ष केंद्रित केले जाईल आणि महिलांची समानता व संधी यावर भर दिला जाईल, असेदेखील मोदी यांनी म्हटले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply