Breaking News

महिला व बालकल्याण विभागाकडून बालकांच्या आधार कार्डसाठी उपक्रम

पनवेल : वार्ताहर

शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण प्रकल्प 1च्या विद्यमाने करंजाडे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गुरुवार (दि. 7) पासून बालकांचे आधारकार्ड नोंदणी करून देण्याची मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. हा उपक्रम महिला व बालकल्याण प्रकल्प 1 चे अधिकारी चेतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपवायझर गव्हाण 2 चे एस. एस. राऊत, रसिका शिंदे, स्मिता गोडबोले, अंगणवाडी सेविका अश्विनी भोपी, जयश्री गोंधळी व मदतनीस या वेळी उपस्थित होते. आधारकार्डशिवाय कुठलीही शासकीय योजना राबविण्यात येऊ नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. अंगणवाडीत लाभ घेणार्‍या शून्य ते सहा वर्षे वयोगटाच्या बालकांचे तसेच ग्रामीण भागातील महिलांचे आजही आधारकार्ड नाही. त्यामुळे शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतच आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.  महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून पनवेल परिसरातील अंगणवाड्यांमध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना राबविण्यात येते. शासनाने आधार सक्ती केल्याने या योजनेंतर्गतचा लाभ बंद होऊ नये म्हणून बालकांची आधार नोंदणी आवश्यक आहे. मात्र, पनवेल परिसरातील ग्रामीण भागात आधार नोंदणी केंद्रांची कमतरता असल्याने लाभार्थी बालक, मातांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण प्रकल्प 1 चे अधिकारी चेतन गायकवाड यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या आधार नोंदणीला सुरुवात झाली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी व संदर्भ सेवा पुरविण्यात येतात. या योजनेंतर्गतचा लाभ देताना बोगस लाभार्थी दाखविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगस लाभार्थीला चाप बसावा या दृष्टिकोनातून लाभार्थ्यांची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांची आधार नोंदणी झालेली आहे व त्यांचे आधारकार्ड योजनेशी जोडण्यात आले आहे. अंगणवाडीतील सर्व बालकांच्या आधार क्रमांकाची माहिती संकलित केली जात आहे. तसेच ज्यांनी आधार नोंदणी केली नाही किंवा ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही अशा बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम पर्यवेक्षिकांना देण्यात आले आहे. त्यानुसार आधारकार्ड नोंदणीला करंजाडे येथील जिल्हा परिषद शाळेत सुरुवात झाली आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply