आई डे केअर शाळेकडून वाजवी दरात विक्री
पेण : प्रतिनिधी
जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याने त्यावर मात करण्यासाठी वापरण्यात येणार्या मास्कच्या मागणीत वाढ झालेली आहे. मार्केटमधील वाढत्या मागणीचा विचार करता पुरवठादेखील कमी होत चालला आहे. या मास्कची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना वाजवी किमतीत मास्क मिळावा या उद्देशाने पेणमधील आई डे केअर गतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत: आपल्या मेहनतीन हजारो मास्क तयार करून स्वयंरोजगार निर्मितीही केली आहे.
पेणमधील आई डे केअर गतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आणि त्यांच्यातील बौद्धिक ज्ञानाचा समाजाला कुठेतरी उपयोग करून देण्यासाठी या शाळेतील शिक्षकांनी त्यांना मास्क बनविण्याचे प्रशिक्षण दिले. काही दिवसांतच हे विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन मास्क बनविण्यासाठी सज्ज झाले आणि आजमितीला ते हजारो मास्क तयार करून मास्कच्या वाढत्या मागणीचा पुरवठा करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी बनविलेले मास्क संस्थेच्या माध्यमातून अगदी कमी किमतीला विकले जात आहेत. बाजारात ज्या मास्कची किंमत 40 ते 50 रुपये आहे, तेच या विद्यार्थ्यांनी बनविलेले मास्क अवघ्या 10 रुपयांना विकले जात असल्याने या मुलांनी बनविलेल्या मास्कला संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी वाढत आहे.
मास्क बनविण्याची पद्धत आम्ही यु ट्यूबवरून पाहिली आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. ही मुले मूकबधीर असूनदेखील ती आपल्या मेहनतीन हे मास्क बनवत आहेत, याचे आम्हाला समाधान वाटत असल्याचे शिक्षिका अमिता जाधव यांनी सांगितले.
कापडी पिशव्या बनविण्यासाठी आणलेल्या कापडाचे आम्ही मास्क बनविले. त्यामुळे आम्हाला हे मास्क 10 रुपयांत विकणे सोपे झाले, मात्र वाढत्या मागणीचा विचार करून आम्ही कोल्हापूर, पनवेलसारख्या ठिकाणांहून कापड मागविल्याने आमचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आम्ही पुढील मास्क हे 12 ते 15 रुपयांनी विकण्याचा विचार करीत आहोत. मास्क विकून जमलेले पैसे आम्ही या विद्यार्थ्यांच्या बँकखात्यात जमा करतो, अशी माहिती आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांनी दिली.