चेन्नई : वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व वैद्यकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये टेस्ट लॅब वाढवण्याला सुरुवात झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्यांनी प्रमुख शहरे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही दिवसांपूर्वी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. याचसोबत सध्याच्या कठीण परिस्थितीत जी लोकं अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत त्यांचे कौतुक करण्यासाठी घराबाहेर येऊन टाळ्या वाजवत आणि घंटानाद करण्याचे आवाहनही मोदींनी केले होते. त्यास आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाने भन्नाट प्रतिसाद दिला आहे.
सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, हरभजन सिंग आणि केदार जाधव या खेळाडूंचा एका शुटदरम्यानचा डान्स करतानाचा व्हिडीओ चेन्नईने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यांनी अनोख्या पद्धतीने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
कोरोनामुळे सध्या देशात गंभीर वातावरण आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरु यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सापडत आहेत. महाराष्ट्रातही शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. सर्व वैद्यकीय यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. त्यामुळे या विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण कधी मिळवता येतेय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper