Breaking News

मोदींची सुयोग्य प्रशंसा

मोदी सरकारने 80 कोटी जनतेसाठी रेशनचे मोफत धान्य उपलब्ध करून दिले. 20 कोटी 40 लाख गरजू स्त्रियांच्या बँक खात्यात रोख रक्कम टाकण्यात आली. 80 कोटी जनतेला मोफत घरगुती गॅस उपलब्ध करून देण्यात आला, याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केला आहे.

कोरोना फैलावाच्या संदर्भातील आपल्याकडची आकडेवारी सातत्याने वाढतच आहे. गुरुवारी राज्यात 81 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. आजवरच्या दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा हा आकडा बराच मोठा आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 416वर पोहचली आहे. यापैकी 19 जणांचा या साथीत बळी गेला आहे. देशातील इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्र कोरोना टेस्टिंगमध्ये पुढे आहे. एकट्या मुंबईत रोज सात-आठशे जणांची टेस्ट केली जात आहे. मुंबईत आजवर 6200 जणांची कोरोना टेस्ट पार पडली आहे, तर देशातील काही राज्यांमध्ये हा आकडा निव्वळ सात-आठशे इतका आहे. जागतिक स्तरावरही भारतासारख्या विकसनशील देशाने परिस्थिती कौतुकास्पद रीतीने हाताळली आहे, असा सूर उमटू लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी मोदीजींची प्रशंसा केली आहे. लॉकडाऊनसारख्या निर्णयाचा मोठा फटका गोरगरीब जनतेला बसू शकतो, परंतु मोदी यांनी दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी वेळीच मदतीची घोषणा केली, असे म्हणत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी आपल्या ट्वीटमध्ये मोदी सरकारकडून दिल्या गेलेल्या मदतीचा विशेषत्वाने उल्लेख केला. इतर अनेक विकसनशील देशांना अशा तर्‍हेच्या समाजकल्याणाच्या योजना राबवणे आव्हानात्मक वाटू शकेल, असेही त्यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी मोदींची अशी प्रशंसा केली असताना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र नेमका तोच मुहूर्त साधून लॉकडाऊनचा निर्णय योग्य असला तरी त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याची टीका गुरुवारी केली. सरकारच्या लॉकडाऊनच्या प्रयत्नांतूनच आपण कोरोनाचा फैलाव अपेक्षापेक्षा प्रभावीरीत्या आटोक्यात ठेवू शकलो आहोत. असे असताना श्रीमती गांधी यांनी केलेली टीका देशात कुणाला तरी पटेल का? विरोधकांचे खोडा घालण्याचे प्रयत्न हे असे सुरूच असताना मोदी मात्र झोकून देऊन देशातील जनतेला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्याच्या कामी जुंपलेलेे आहेत. गुरुवारी त्यांनी देशातील तमाम राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. सर्व पंथ, सर्व विचारधारांच्या लोकांनी एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला केला पाहिजे, असा सुयोग्य मार्ग मोदींनी सुचवला आहे. सर्व सांप्रदायांच्या धर्मगुरूंनी आपल्या अनुयायांना लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करावे व या कोरोनाविरोधी लढाईत आपले योगदान देण्याच्या दृष्टीने लोकांची समजूत काढावी, असे मोदींनी म्हटले आहे. देशाच्या कोरोनाविरोधी लढाईत मोदी इतक्या प्रभावीपणे नेतृत्व करीत असताना विरोधकांपैकी कुणीही कितीही टीका केली तरी त्याचा समाजमनावर कोणताही परिणाम होणार नाही हे निश्चित. 14 तारखेला लॉकडाऊन संपल्यानंतरदेखील ही लढाई सुरूच राहणार आहे याची जाणीवही मोदींनी आधीच करून दिली आहे. नंतरच्या खबरदारीच्या दृष्टीने त्यांनी अनेक मोलाच्या सूचना केल्या आहेत. जनतेला संदेश देताना ते नेमके काय मार्गदर्शन करतात याविषयी सार्‍यांनाच उत्सुकता आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply