Breaking News

सिडकोची चिपळे गावात अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाई

पनवेल ः प्रतिनिधी

सिडकोच्या नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नैना) विभागातर्फे पनवेल तालुक्यातील चिपळे गाव येथे अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाई करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे सतीशकुमार द. खडके, अनधिकृत बांधकामे नियंत्रक (नैना) अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भूमापक विशाल ठेले, अमोल तांबे, शिवराज चव्हाण आणि कमलेश पाटील यांच्या पथकाने स्थानिकांचा प्रखर विरोध असतानाही सदर कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नैना) विभागातर्फे एमआरटीपी 1966 कायद्याच्या कलम 54 (1) अन्वये अनधिकृत बांधकामधारक एकनाथ कोंडू म्हात्रे यांना नोटीस  बजावण्यात आली होती. या वेळी सदर कारवाईदरम्यान 3000 चौ. फूट क्षेत्रावर करण्यात आलेले तळमजला अधिक तीन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

नैना विभागाची किंवा नैना प्राधिकरण अस्तित्वात येण्यापूर्वी अधिकार असलेल्या सक्षम प्राधिकरणाची कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी न घेता सदर अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते आणि नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नैना) यांनी प्रचलित कायद्याप्रमाणे प्रक्रिया अवलंबून सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित केले. सदर कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल रवींद्र गिड्डे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे, पोलीस निरीक्षक ढाकणे, 70 पोलीस कर्मचारी, 15 महिला पोलीस कर्मचारी आणि दोन पिंजरा पोलीस व्हॅन यांच्या साहाय्याने  यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. कारवाईवेळी सिडकोतील सहाय्यक सुरक्षा अधिकारी नलावडे, सुरक्षारक्षक, एमएसएफ कर्मचारीही उपस्थित होते. सदर कारवाई पार पाडतेवेळी 15 कामगार तैनात करण्यात येऊन एक ट्रक, 10 जीप, दोन पोकलेन आदी यंत्रसामुग्री वापरण्यात आली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply