कर्जत ः बातमीदार
कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने नेरळ चार दिवस बंद आहे, तर कर्जत शहरासह संपूर्ण तालुका बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील जनतेने जनता कर्फ्यू पाळला आहे, मात्र त्याही स्थितीत मोठ्या प्रमाणात बाइक रस्त्यावर दिसत आहेत. त्यांच्या बाइकसाठी पेट्रोल दिले जात नसल्याने पेट्रोलसाठी वाहनचालक भांडणे करू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांवर पेट्रोलपंपावर दंगामस्ती करणार्यांना आवर घालण्याची वेळ आली आहे.
संचारबंदीमुळे फक्त अत्यावश्यक सेवा पुरविणार्या वाहनांंनाच पेट्रोलपंपावरून पेट्रोल दिले जात आहे. असे असतानाही विनाकारण विविध कारणे पुढे करीत भटकणार्यांची संख्या काही कमी नाही. असे मोकाट वाहनधारक पेट्रोलपंपावर जाऊन पेट्रोल भरून देण्याकरिता तेथील कर्मचार्यांना दमदाटी करीत आहेत. त्यामुळे बाचाबाची होऊन संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. अशा पेट्रोलपंपांवर पोलीस बंदोबस्त पुरवावा, अशी मागणी पंप मालकांकडून होत आहे. गाडीत पेट्रोल टाकून मिळावे म्हणून तरुणाई विविध शक्कल लढवत आहे आणि तरीही हा प्रयोग यशस्वी झाला नाही तर पेट्रोल देण्यासाठी दबाव टाकत आहेत. दररोज सायंकाळी सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने दिसत आहेत.त्यांना पेट्रोल मिळते कुठून, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अत्यावश्यक सेवा देणार्यांकडून गाडीत पेट्रोल टाकले जात असून त्यांच्याकडून उडाणटपू बाइकस्वारांना पेट्रोल पुरविले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे
लॉकडाऊनच्या काळातही वाहने पेट्रोलपंपावर येत आहेत. कर्जत-मुरबाड रस्त्यावर दररोज दिसणार्या वाहनांना खांडस ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आक्षेप घेतला आहे. सरपंच मंगल ऐनकर यांनी तहसीलदारांना पत्र देऊन अशा बाइकस्वारांना आवर घालण्याची मागणी केली आहे. कर्जत तालुक्यातील पेट्रोलपंप मालकांनी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही वाहनांना पेट्रोल देऊ नये, असे रायगड जिल्हाधिकार्यांचे निर्देश आहेत.तरीदेखील इतर वाहनांना पेट्रोल दिले जात आहे. याकडे प्रशासन लक्ष देईल का, असा सवाल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper