Breaking News

रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना शासनाच्या माध्यमातून अन्नधान्य द्या; आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यातील विशेषत्वाने पनवेल तालुक्यातील रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना राज्य शासनाच्या माध्यमातून अन्नधान्याची तातडीने मदत मिळावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनाही देण्यात आले.

या वेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे की, निरनिराळ्या विकामकामांच्या तसेच उद्योगधंद्यांच्या निमित्ताने देशातील वेगवेगळ्या राज्यांतून व महाराष्ट्राच्या विविध भागातील अनेक लोक पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात राहत आहेत. कोरोना महामारीचे संकट आणि लॉकडाऊनमुळे या सर्वांचा रोजगार बंद झाला आहे. शासकीय अधिकार्‍यांकडून प्राप्त माहितीनुसार ही संख्या एक लाख 50 हजारांच्या आसपास आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने या सर्वांची उपासमार होत आहे. राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, शासनाची मदत यानंतरही कुटुंबासह राहणार्‍या लोकांना रोज जेवण मिळेलच याची शाश्वती नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने तसेच पोलिसांकडून जमाव पांगवण्याच्या विविध प्रयत्नांमुळे अनेकांना उपासमारीस सामोरे जावे लागते. महाराष्ट्र शासनाने मे व जून महिन्यात धान्य देण्याचे जाहीर केले असले तरी ज्यांच्याकडे स्थानिक रेशनकार्डच नाही अशा सुमारे दीड लाख लोकांना शासनाकडून तातडीने अन्नधान्याची मदत होणे अपेक्षित आहे. म्हणून शासनाच्या आकस्मित निधीतून खर्च करून स्वस्त धान्य दुकानांमार्फत या लोकांना विशेष बाब म्हणून तांदूळ, डाळ, तेल यांसारख्या अन्नधान्याच्या वस्तू पुरवल्या जाव्यात व त्याची तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply