
खोपोली : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधित नसलेल्या तालुक्यांमध्ये छोट्या-छोट्या उद्योगांना परवानगी द्यावी, असंघटित क्षेत्रातील कामगारांना इतर खर्चासाठी आर्थिक मदत द्यावी, त्याचप्रमाणे स्थलांतरित कामगारांना परतीसाठी त्यांच्या भागात विशेष रेल्वेसेवा सुरू करावी या व इतर मागण्या खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी केल्या आहेत. यासोबत त्यांनी विविध गोष्टींकडे मुख्यमंत्र्यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले असून, कार्यवाहीची अपेक्षा केली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित क्षेत्र वगळता काही ठिकाणी कारखाने सुरू करण्याबाबत 20 एप्रिलपासून हालचाली सुरू झाल्या, पण त्या अचानक थांबविण्यात आल्या. एमएमआर भागात काही कारखान्यांना परवानगी दिली जाते, तर काहींना दिली जात नाही. जिल्ह्यात जेएसडब्ल्यूसारखा कारखाना सुरू आहे. त्याच अटीशर्तींवर इतर कारखान्यांना परवानगी द्यावी, कारण सद्य परिस्थितीत कामगारवर्गाची फारच हलाखीची परिस्थिती आहे. बंद काळात पगार मिळणार की नाही याची चिंता त्या कामगारांना आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे मसूरकर यांनी म्हटले आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक, माल वाहतूक टेम्पो, टुरिस्ट, माथाडी नाका कामगार, नाभिक समाज, धुणीभांडी करणार्या महिला, चौकीदार आदींना तांदळाशिवाय काहीच मिळाले नाही. खर्चसाठी पैसे नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबणा होत असल्याने राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून तातडीने किमान तीन हजार रुपये प्रतिमहिना द्यावेत, असेही मसूरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
शिंग्रोबाचा उत्सव कोरोनामुळे रद्द
खालापूर : प्रतिनिधी
धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबाचा 1 मे रोजी होणारा उत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बोरघाटाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वीर हुतात्मा शिंग्रोबाचे मंदिर बोरघाटात आहे. तेथे दरवर्षी 1 मे रोजी उत्सव होत असतो. या उत्सवाला महाराष्ट्रातून समाज बांधवासह, भाविक-भक्त मोठ्या संख्येने येत असतात, मात्र सध्या सर्वत्र असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यातील अनेक मोठमोठे कार्यक्रम, सण-उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्याची दखल घेत वीर हुतात्मा शिंग्रोबा उत्सव कमिटीनेही कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती कमिटीचे संस्थापक बबन शेडगे यांनी दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper