पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या गरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व मजुर काही झोपडपट्ट्यांमध्ये तर काहीजण भाड्याने राहतात. संचारबंदी व जिल्हा बंदी असल्यामुळे हाताला काम नसल्यामुळे सर्वच जण बेरोजगार होऊन घरी बसुन आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून संपुर्ण पनवेल तालुक्यामध्ये गरजू गोरगरीबांना तसेच झोपडपट्टीमधील नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने रविवारी (दि. 26) रोहिंजण गाव, नवीन वसाहत परिसरातील आदिवासी वाडी, बौध्दवाडी, रोहिंजण खडीमशीन झोपडपट्टीमधील बेरोजगार कामगार, भाडेकरु गोरगरीब नागरिक यांना नगरसेवक संतोष भोईर, नंदुकुमार म्हात्रे, पांडुरंगशेठ पाटील, श्रीपत पाटील, चंद्रकांत पाटील, समाजसेवक प्रशांत गायकर, बाळाराम पाटील, विश्वनाथ पाटील, सचिन तांबे यांच्या विशेष प्रयत्नाने अन्नधान्य वाटप करण्यात आले. या वेळी या सर्वांच्या चेहर्यावर समाधान व हास्य पाहुन केलेली सेवा सार्थकी लागल्याचे
दिसून आले.