Breaking News

डोंगर चढून आलेल्या मजुरांची धरपकड

अकोला जिल्ह्यात जाण्याचा प्रयत्न; नेरळ पोलिसांकडून पुन्हा पनवेलला रवानगी

कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने सर्व कामधंदे बंद आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गावाची ओढ असलेले रस्त्याने चालत निघाले आहेत, मात्र पनवेल येथे मजूर म्हणून काम करणारे चक्क डोंगर चढून अकोला जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले होते. पेब किल्ला चढून आणि नंतर तो डोंगर उतरून ते नेरळच्या हद्दीत पोहचले, पण नेरळ येथे त्यांना पोलिसांनी अडवले असून त्यांना थांबवून जेवण देऊन पुन्हा आले त्याच रस्त्याने घरी पाठवण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन सुरू केले असून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कोणालाही कुठेही जाता येणार नाही याची काळजी घेतली जात आहे.त्यावेळी कोणत्याही वाहनातून अडकून पडलेले मजूर आणि कामगार जाणार नाहीत याची काळजी पोलीस प्रशासन घेत आहे, मात्र लॉकडाऊन उठत नसल्याने जागोजागी अडकून पडलेल्या कामगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अनेक मजूर आणि कामधंदा नसल्याने कामगार आपल्या गावाकडे निघाले होते.  पनवेलमध्येमजूर म्हणून काम करणार्‍या अकोला जिल्ह्यातील 30 मजुरांनी दुपारी पनवेल सोडले. महिला आणि पुरुष असे हे मजूर पनवेल येथून शिरवली जंगलातून डोंगर चढून पेब किल्ल्यावर पोहचले. तेथून खाली उतरण्यासाठी प्रवास सुरू केला. डोंगर चढून आलेले मजूर हे पुन्हा डोंगर उतरून खाली उतरले आणि नेरळ येथे स्थानिक आदिवासी लोकांच्या नजरेत पडले. त्यानंतर आनंदवाडी येथील आदिवासी लोकांनी ही बाब मोहाचीवाडीमधील कार्यकर्त्यांना सांगितली.

बाहेरील मजूर आल्याची माहिती मिळताच नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक पथक तत्काळ तेथे पोहचले. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने सर्व मजुरांची तपासणी केली. नेरळ पोलीस तेथे येऊन त्या सर्वांना सायंकाळी त्याच ठिकाणी थांबवण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील आणि महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप यांनी सर्वांना सूचना देऊन उद्या सकाळी पुन्हा आले त्या ठिकाणी परत जाण्याचे आदेश दिले. सर्व 30 मजुरांची राहण्याची व्यवस्था तेथील एका इमारतीत, तर रात्रीच्या जेवणाची व्यवस्था स्थानिक रहिवासी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान चव्हाण यांनी केली. याबाबत अधिक माहिती पोलिसांनी घेतली असून सर्व मजूर पुन्हा पनवेल येथे पोहचले आहेत.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply