पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, तटकरे, उदयनराजे
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी (दि.14) राष्ट्रवादीनेही पहिली यादी जाहीर केली, मात्र या यादीत माढा आणि मावळ या दोन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा न करता सस्पेन्स कायम ठेवला आहे. जाहीर झालेल्यांमध्ये सुप्रिया सुळे (बारामती), सुनील तटकरे (रायगड), छत्रपती उदयनराजे (सातारा) आदींच्या नावांचा समावेश आहे.
माढ्यातून शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, पण गेल्याच आठवड्यात पवारांनी मी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले, पण ते करीत असताना राष्ट्रवादीने माढ्यातून पक्षाचा कोण उमेदवार असेल याबाबत घोषणा करणे टाळले आहे.त्यामुळे माढ्यातून पवारच उभे राहू शकतात यावरही चर्चा रंगू लागली आहे.
मावळमध्ये शरद पवारांचे नातू आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार निवडणुकीची तयारी करीत आहे. त्यांच्या नावाचीही राष्ट्रवादीने घोषणा केली नाही.त्यामुळे या दोन मतदारसंघांत नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
राष्ट्रवादीचे उमेदवार
सुप्रिया सुळे-बारामती, सुनील तटकरे-रायगड, उदयनराजे भोसले-सातारा, आनंद परांजपे-ठाणे, बाबाजी पाटील-कल्याण, धनंजय महाडिक-कोल्हापूर, मोहम्मद फैजल-लक्षद्वीप, संजय दीना पाटील-ईशान्य मुंबई, राजेंद्र शिंगणे-बुलडाणा, गुलाबराव देवकर-जळगाव, राजेश विटेकर-परभणी.
हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींना राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
आता राष्ट्रवादीची इतर उमेदवारांची यादी पुढील दोन दिवसांत जाहीर होईल, असेही पाटील यांनी सांगितले. या वेळी अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.