कळंबोलीतून नऊ महिलांना अटक
पनवेल : बातमीदार
घुसखोरी करून भारतात राहत असलेल्या बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. कळंबोली पोलिसांनी नुकतेच स्टील मार्केट व इतर परिसरातून अश्लील हावभाव व हातवारे करणार्या 11 महिलांना ताब्यात घेतले आहे. यातील नऊ महिला बांगलादेशी आहेत. त्यामुळे नवी मुंबई परिसरात बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण वाढ़ू लागले आहे. कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, खारघर आदी परिसरात बांगलादेशी नागरिक व महिला वास्तव्यास असल्याचे यापूर्वीदेखील उघड झाले आहे. कळंबोली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बांगलादेशी महिला नवी मुंबई परिसरात वेश्याव्यवसाय करीत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. कळंबोली पोलिसांनी 24 फेब्रुवारी रोजी स्टील मार्केट, 5 नंबर पार्किंग व जवळच्या परिसरातून वेश्याव्यवसाय करणार्या 11 महिलांना ताब्यात घेतले. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड़ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्चना चिवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, ऋषिकेश घाडगे व त्यांच्या पथकाने कळंबोली व खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसाय करणार्या महिलांवर कारवाई केली. या महिला रेल्वे स्टेशनच्या पटरीच्या बाजूला असलेल्या भिंतीलगत लागून असलेल्या पार्किंगमधून येणार्या जाणार्या लोकांना पाहून अश्लिल हावभाव करीत असत. यातील नऊ महिला बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, तर इतर दोन महिलांवर अंगप्रदर्शन व अश्लील हावभाव केल्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर या महिला कोणती तरी बाब पोलिसांपासून लपवत असल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्याकडे राहत्या ठावठिकाण्याबाबत व कागदपत्रांची मागणी आणि इतर काही पुरावे आहेत का याबाबत सखोल विचारपूस केली असता सदर महिलांनी त्या बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले आहे. त्यांच्या नागरिकत्वाबाबत त्या कोणताही पुरावा अथवा कागदपत्रे सादर करू शकल्या नाहीत, तसेच बांगलादेशातून भारतात प्रवेश आणि वास्तव्य करण्यासाठी लागणारे पारपत्र (पासपोर्ट) किंवा इतर कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची रवानगी भायखळा तुरुंगात केली आहे.