
पाली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या वैश्विक महामारीत सुधागड तालुक्यातील वासुंडे ग्रामस्थांनी एक आदर्शवत व सेवाभावी उपक्रम हाती घेतला आहे. माणुसकी व सामाजिक बांधिलकी जपत स्वयंस्फूर्तीने गरीब व गरजवंतांना धान्य दानाची अनोखी मोहीम या गावात राबविली जात आहे. टाळेबंदीत श्रमजीवी, कष्टकरी मजूर, हातावर पोट असलेले आदिवासी बांधव यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. टप्प्याटप्प्याने वाढ होत असलेला लॉकडाऊनचा कालावधी व हाती रोजगार नसल्याने अनेक कुटुंबांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. या काळात कुणाचीही उपासमार होऊ नये या हेतूने वासुंडे गावचे रास्त भाव दुकानदार हरीचंद्र पाटील यांनी ग्रामस्थांपुढे या सेवाभावी उपक्रमाचा प्रस्ताव ठेवला. ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ धान्य गोळा करून गरजवंतांना देण्यास प्रारंभ केला. स्वयंस्फूर्तीने स्वतःला मिळालेले धान्य गरीब, गरजवंतांना वाटप करणारे हे एकमेव गाव ठरल्याचे कौतुक पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले. कोरोना आपत्तीच्या अनुषंगाने गावोगावी नागरिकांना रास्त भाव धान्य दुकानातून धान्य व जीवनावश्यक साहित्य मिळत आहे, मात्र समाजातील काही घटक आज या लाभापासून वंचित आहेत. या जाणिवेतून समाजातील मध्यमवर्गीय घटकाने पुढाकार घेत धान्य दान करण्याची संकल्पना राबवली आहे. सुधागड तालुक्यात लॉकडाऊनमध्ये ठिकठिकाणी मजूर, आदिवासी बांधव, मेंढपाळ अडकून पडले आहेत. अशा गरजवंतांना सदरच्या अन्नधान्याचा मोठा आधार ठरणार असून वासुंडे ग्रामस्थांनी हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आ. रविशेठ पाटील यांनी काढले. सदर धान्यदान कार्यक्रमास आ. रविशेठ पाटील, पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, राजेश मपारा, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पाटील, उपसरपंच विलास पालवे, मनीष पालवे, ग्रामपंचायत सदस्य श्याम दळवी, ग्रामसेवक पवार, पांडुरंग दळवी, श्रीकांत सरनाईक, गणेश दळवी, कृष्णा दळवी आदी उपस्थित होते.