Breaking News

वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ः महाराष्ट्र बाद फेरीत

मुंबई ः प्रतिनिधी

महाराष्ट्राने ह गटातील शेवटच्या सामन्यात उत्तरांचलचा 39-14 असा लीलया पराभव करीत 68व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत धडक दिली. महाराष्ट्राची बाद फेरीतील पहिली लढत केरळ संघाशी होईल. उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय बंदिस्त क्रीडा संकुलात ही स्पर्धा खेळली जात आहे. महाराष्ट्राने सुरुवातच अशी आक्रमक केली की पूर्वार्धात दोन लोण देत 25-04 अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण दिला आणि आपल्या हातून आघाडी निसटणार नाही याची काळजी घेत सावध खेळ करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. सायंकाळच्या सत्रात बाद फेरीचे सामने खेळावयाचे असल्याने महाराष्ट्राने संयमी खेळ केला. महाराष्ट्राने सिद्धार्थ देसाईला  संधी दिली. त्याने व पंकज मोहितेने चढाईत गुण घेत आपले काम चोख बजावले. उत्तरार्धात त्यांना विश्रांती देऊन सुशांत साईल व निलेश साळुंखे यांना संधी देण्यात आली. डावा कोपरारक्षक गिरीश इरनाक व उजवा मध्यरक्षक मयूर कदम यांचा ताळमेळ चांगलाच जुळून आला. त्यांना शुभम शिंदेची उत्तम साथ लाभली. महाराष्ट्राचा हा विजय सांघिक होता. भक्कम बचाव व त्याला मिळालेली चढाईपट्टूची कौशल्यपूर्ण साथ हे आजच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने  गुजरातचा 51-19 असा धुव्वा उडवित दुसर्‍या विजयाची नोंद केली. महाराष्ट्राने पहिल्या दोन-तीन मिनिटांच्या झटापटीनंतर सातव्या मिनिटाला गुजरातवर पहिला लोण देत 11-04 अशी आघाडी घेतली. पुन्हा आणखी तीन मिनिटाच्या फरकाने 10व्या मिनिटाला झटपट दुसरा लोण देत ही आघाडी 20-04 अशी वाढविली. मध्यांतरापर्यंत 26-06 अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. उत्तरार्धातदेखील आपला जोश कायम ठेवला व आणखी दोन लोण प्रतिस्पर्ध्यावर चढवित सामना एकतर्फी केला. उत्तरार्धात महाराष्ट्राने पंकज व रिशांक यांना विश्रांती दिली. पंकज मोहिते, अजिंक्य पवार यांच्या धारदार चढाया त्याला गिरीश इरनाक व शुभम शिंदेच्या पकडीची मिळालेली भक्कम साथ यामुळे हा विजय सोपा झाला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply