रेड झोनमधील मद्यप्रेमींची वाइन शॉपवर गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

पनवेल : वार्ताहर
कोरोना साथीचा आजार संपूर्ण देशभरात थैमान घालत असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊन येत्या 31 मेपर्यंत हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यातच नुकतेच दारूची दुकाने काही ठिकाणी सुरु केल्याने तळीरामांची प्रचंड गर्दी वाइन शॉपवर होत आहे. नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत कोठेही दारूची दुकाने उघडली गेली नसल्याने तळीरामांनी आपला मोर्चा रसायनी, मोहोपाडा, कर्जत, चौक, पेण याठिकाणी वळवला आहे. कोरोना व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव टाळावा याकरिता शासनाने प्रतिबंधीत व पारीत केलेल्या अधिसूचनांचे उल्लंघन करून मुंबई, विरार, वसई, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, पनवेल परिसरातून मद्यप्रेमी रसायनी, मोहोपाडा याठिकाणी मद्य खरेदीसाठी येत असून याठिकाणी झुंबड उडत आहे. रसायनी, मोहोपाडा याठीकाणी अमर वाइन्स व डिम्पल वाइन या दोन दुकानात पनवेल, नवी मुंबई, मुंबई परिसरातून प्रचंड गर्दी होत असून याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून येतो. दारूविक्रीसाठी बंदी नसली तरी दारू वाहतूक करण्यासाठी बंदी असल्याने चोर मार्गाने दारु ये-जा केली जाते. चेकपोस्टवर अनेक वेळा चेकींग होते. काही वेळा जास्तीचा माल जप्त केला जातो. तर कित्येकदा समज देवून त्यांना सोडण्यात येते. परंतु सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर अशाप्रकारे जनता मोहोपाडा, रसायनी, कर्जत, चौक, पेण या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात आल्यास कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता असल्याने अशा दारु बहाद्दरांना वेळीच आवर घालावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper