आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू कलाकाराला थांबणं अजिबात मंजूर नाही. आजही अमिताभ बच्चन एक्सवर (अर्थात ट्विटरवर) कार्यरत आहे. काळासोबत बदलणं म्हणजे काय हे अमिताभ बच्चनकडून शिकावं. आपल्या कारकिर्दीत अमिताभ बच्चनने अनेक चढउतार अनुभवले, आणि त्यातून आपला मार्गही काढला. विशेषतः नवीन पिढीतील पटकथा आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक यांच्या चित्रपटांतून भूमिका साकारत त्यांनी स्वतःला छान अपडेट ठेवले. कौन बनेगा करोडपती हा खेळ तब्बल पंचवीस वर्षे सुरू आहे, त्यावरची आपली मुद्रा त्यांनी कायम ठेवली आहे. अशा या अमिताभ बच्चनची आणखी एक बाजू आहे. कधीच न दिसलेली. कधीच न पाहता आलेली अशी ती आहे. आजच्या वाढदिवसानिमित्त ती पाहूया. आजच्या ग्लोबल युगातील जेन झी आणि जेन अल्फा पिढीलाही त्याबाबत उत्सुकता वाटेल.
आता तुम्हीच सांगा, अमिताभ बच्चनची भूमिका असलेला ‘यार मेरी जिंदगी’ नावाचा ‘पिक्चर’ माहित आहे का? अमिताभ बच्चनच्या चित्रपटांची नावे हा वेगळा विषय आहे. लगेच गुगल सर्च करु नका आणि जरी केलेत तरी ‘त्यामागची स्टोरी’ माहित पडणार नाही. या गोष्टीला बॅक स्टोरी असेही म्हणतात. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीची गोष्ट. त्या दिवसात हिंदी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस आम्हा सिनेपत्रकारांना मुंबईत झालेच पण डलहौसीपासून चैन्नईपर्यंत ( तेव्हाचे मद्रास) ‘पिक्चरच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींग’ साठी घेऊन जात असत. तेथील ‘ऑखो देखा हाल’ आम्ही लिहायचा इतका व असा तो ‘सोपा पेपर’ असे. गृहपाठ, पाठांतर अशी काहीच कटकट नसे. ‘जे दिसेल ते क्रिकेट सामन्याच्या समालोचनासारखे लिहायचं’
(वाढवून, शिजवून, खुलवून, रंगवून लिहिलं तरी चाले. चित्रपटाच्या जगासारखेच ते होते.) तेव्हाचा वाचक तेच जास्त वाचायला उत्सुक असे. या सदराच्या ‘ऐसपैस जागे’वरुनच ते दिसून येई. अशातच एके दिवशी जुहूच्या एका बंगल्यात अमिताभ, शत्रुघ्न सिन्हा, शारदा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘यार मेरी जिंदगी’च्या सेटवर येण्याचे आमंत्रण हाती आले. अमिताभने मीडियावरचा ‘बॅन’ उठवून आणि सविस्तर मुलाखती देण्याला सुरुवात करुन एक दीड वर्ष झालं असेल म्हणून वेळेपूर्वीच सेटवर पोहचलो. (ऐंशीच्या दशकात बराच काळ अमिताभ बच्चन फिल्मी पत्रकारितेवर खफा होता. फक्त आणि फक्त त्याच्या नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताला त्याचं दर्शन घडे. हा स्वानुभव आहे.)
‘सेटवरचा अमिताभ’ यावर ‘लक्ष्य’ कायम राहिल असा ॲन्गल पकडला. सेटवर आणखीन चार-पाच सिनेपत्रकार व काही फोटोग्राफर होते. सगळेच बच्चनसाहेब कधी येणार याकडे ‘डोळे’ लावून होतो. दिग्दर्शक अशोक गुप्ता सुधाचंद्रनवर काही दृश्ये चित्रीत करीत होता. ती तेव्हा पार्ल्यात राहत असल्याने मराठी बरं बोलायची. पण या ‘अवांतर गोष्टी’ यावेळी महत्वाच्या नव्हत्या. एकच लक्ष्य अमिताभ बच्चन. आणि ते स्वाभाविक होतेच. तासाभराने ‘कॅमेऱ्याच्या मागची’ गोष्ट समजली. ती जास्त रंजक असते. या चित्रपटाचा मुहूर्त १९७१ साली राजेश खन्नाच्या हस्ते झाला होता आणि दिग्दर्शन मुकुल दत्त करीत होता. (जे. ओम प्रकाश निर्मित राजेश खन्ना व आशा पारेख यांच्या भूमिका असलेल्या ‘आन मिलो सजना’चे दिग्दर्शन तेव्हा मुकुल दत्त करीत असल्यानेच राजेश खन्ना मुहूर्त क्लॅप द्यायला आला.जेवढे मागं जावं तेवढं वेगळं काही समजतं.) याच मुकुल दत्त दिग्दर्शित ‘रास्ते का पत्थर’ (१९७२) अमिताभ व शत्रुघ्न सिन्हाच होते. तो प्रदर्शित झाला, फ्लॉपही झाला. पण या ‘यार मेरी जिंदगी’चे काय? काही रिळांचे शूटिंग होईपर्यंत प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (१९७३) आला आणि एका सूडनायकाचा जन्म झाला. अमिताभ आता ‘वरच्या वर्गात’ आला होता. एक नवीन इतिहास घडत होता. अगोदर ‘साईन’ केलेल्या चित्रपटांकडे त्याचे दुर्लक्ष झालं (की केलं? सिनेमाच्या जगात कधी, कुठे, का, कशाला, केव्हा, किती लक्ष द्यायचं न द्यायचं हे परिस्थिती शिकवते. तो खेळही जमावा लागतो. चित्रपट अभ्यासक्रमात याचीही दखल हवी असं वाटतं का?
पिक्चर मागे पडतयं म्हणून मुकुल दत्तने दिग्दर्शन सोडले. व्यावसायिक रणनीती म्हणायची का? अशोक गुप्ताने ते दिग्दर्शन स्वीकारले. चित्रीत झालेला ‘अधला मधला’ भाग पाहिला. (चित्रपट असाच तर बनत असतो. चित्रीकरणाची एक पटकथा असते. त्याला स्टोरी बोर्ड म्हणतात.) तो वापरुन पटकथेत जमेल तसे फेरफार करुन आणि आता पुढील पिढीतील कलाकार घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्याचे पाऊल तर टाकले पण ते पडद्यावर कधी पडले माहित्येय? एक मोठा प्रवास आहे. चक्क २००८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो कोणी पाहिला ते माहित नाही. आणि पाह्यचा तर कशाला ? भलेही या चित्रपटाच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांची नावे असतील. म्हणून काय वाटेल ते पाहायचं?
खूपच मोठा वळणावळणाचा प्रवास करत करत, थांबत थांबत हा चित्रपट एकदाचा प्रदर्शित तरी झाला. पण तुम्हालाही कल्पना असेल ‘पडद्यावर येणाऱ्या चित्रपटांपेक्षा काही ना काही कारणास्तव कायमच्या डब्यात जाणाऱ्या चित्रपटांची संख्या जास्त आहे.’तो’ न घडलेला खूपच मोठा इतिहास आहे. त्यावर डिजिटल चॅनेलवर एक माहिती आणि मनोरंजनाचा खेळ दाखवता येईल. अमिताभचे तर किमान पंचेचाळीस पन्नास चित्रपट असेच कुठेतरी घोषणेपासून चार सहा रिळांचे शूटिंग झालेय, अशा स्थळांवर कायमचे ‘डब्यात’ गेलेत. त्यातील काही चित्रपट पूर्ण होऊन पडद्यावर आले असते तर….आता तुम्ही म्हणाल, जर तरला काय अर्थ आहे?
अमिताभचेही चित्रपट मध्येच बंद पडलेत हा ‘रियॅलिटी शो’ एव्हाना त्याने, चित्रपटसृष्टीने, मीडियाने आणि त्याच्या चाहत्यांनी स्वीकारलंय आणि हे सतत होत राहिलयं. खुद्द अमिताभ बच्चनला यातील अनेक चित्रपटांची आठवणही नसेल. हादेखील एक खेळाचा भाग आहे. विसरायचं आणि पुढे जायचं हीच अस्सल व्यावसायिकता आहे आणि अमिताभ बच्चनचा सर्वात मोठा गुण म्हणजे काटेकोर व्यावसायिकता. १९७३ साली देवेन वर्मा दिग्दर्शित ‘नाम बडे’ या चित्रपटात अमिताभ व रेखा राव अशी जोडी होती. ही रेखा राव म्हणजे, ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘घाबरायचं नाही’ इत्यादी मराठी चित्रपटातून आपण तिला पाहिलं. बालकलाकार म्हणून तिने ‘जिगरी दोस्त’ वगैरत काम करत असतानाच ती वयात येत असतानाच तिला ‘नाम बडे’ हा चित्रपट मिळाला. पण १९७३च्या मे महिन्यात ‘जंजीर’, जून महिन्यात ‘अभिमान’, ऑक्टोबर महिन्यात ‘सौदागर’, नोव्हेंबर महिन्यात ‘नमक हराम’ प्रदर्शित झाले आणि अमिताभच्या कुंडलीतील ग्रह उच्च झाले. अमिताभ भोवतीचे वातावरण बदलले. नरेंद्र बेदीने ‘बदलत्या वातावरणा’चा वेळीच फायदा उठवण्यासाठी ‘बेनाम’च्या शूटिंगची गती वाढवली. चित्रपटाच्या जगात यशाची भाषा, नाणे जास्त चालते. आणि ‘सतत पुढे पाहणे’ व्यावसायिकदृष्ट्या जास्त आवश्यक असते हे बुद्धिमान अमिताभला कशाला कोणी सांगायला हवे? आणि यशासाठी बरीच ‘प्रतिक्षा’ केल्यावर तर तो अधिकाधिक “फोकस्ड” होणारच.
अमिताभच्या मागे यश लागले तसे त्याचे मृणाल सेन दिग्दर्शित ‘गोतंत्र’ ( केवळ आणि केवळ मृणाल सेनसाठी हा चित्रपट पडद्यावर यायला हवा होता), ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘एक था चंदर एक थी सुधा’ (यात जया भादुरी त्याची नायिका होती) हे केव्हा बंद झाले हे समजलेच नाही. आता देवेन वर्मालाही अमिताभच्या ‘डेट्स प्रॉब्लेम’चा अडथळा येऊ लागला. त्याने ‘नाम बडे’ नाव बदलून ‘पतझड’ केले. तरी शूटिंग पुढे जाईना. अखेर त्याने ‘पतझड’ गुंडाळला आणि शर्मिला टागोरला अमिताभची नायिका म्हणून निवडून ‘बेशरम’ या नावाचा चित्रपट निर्माण करण्याचे पाऊल टाकले. तोही रखडत रखडत प्रदर्शित झाला तेव्हा अमिताभ ‘सुपरस्टार’ होता. बिचारी रेखा राव आजही आपल्या नशिबाला दोष देतेय. याच चित्रपटाचे फोटो तिला मी पाठवले तेवढेच तिला बंगलोर मुक्कामी समाधान.
अमिताभच्या ‘बंद पडलेल्या काही चित्रपटांच्या आठवणी सांगायलाच हव्यात. दिलीपकुमारला एकदा नव्हे, तर ‘विधाता’, ‘कर्मा’ आणि ‘सौदागर’ असे तिनदा दिग्दर्शित करणारे सुभाष घईंच्या दिग्दर्शनात किमान एकदा का असेना पण अमिताभ बच्चन पाहणे खूपच इंटरेस्टींग ठरले असते.(ही भाबडी समजूत नसावी. हा घईवरचा विश्वास?) बीग बिने तब्बल तीन चार पिढीतील अनेक प्रकारच्या/क्षमतेच्या/शैलीच्या/ मानसिकतेच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारलीय. त्यात गुलजार, श्याम बेनेगल, एन. चंद्रा, राकेश रोशन, शेखर कपूर, फिरोझ खान अशा काही दिग्दर्शकांना तो योग आला नाही. राकेश रोशनच्या दिग्दर्शनात बीग बी ‘किंग अंकल’ साकारणार याची चर्चा फार फार रंगली. प्रत्यक्षात जॅकी श्रॉफने ती भूमिका साकारली. सुभाष घई दिग्दर्शित ‘देवा’ (१९८७) च्या मुहूर्ताचे आमंत्रण हाती आले तेव्हा त्यातील ‘ड्रेस कोड-सूट’ हे वाचून गोंधळलो. माझ्यासारख्या गिरगावातील चाळीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय सिनेपत्रकाराकडे सूट तो कसा असेल? कपाटात जागा नाही म्हणून आम्ही अंगावर कपडे ठेवत असू. मला आठवतंय, रेल्वेस्थानकावर स्वस्तात बूट पॉलिश करुन मिळतात हे लक्षात ठेवून चर्नी रोड गाठले होते. अंधेरीच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील ती रात्र चक्क शिस्तबद्ध मुहूर्ताची ठरली. फिल्मी मुहूर्तात नेहमीच असतो तसा गडबड गोंधळ, बारवरचा आवाज नव्हता. सारा कसा ‘साहेबी’ थाट होता.
एका शोमनच्या फिल्ममध्ये महानायक भूमिका करीत होता ना? गंमत म्हणजे, नायिकेची निवड न करताच फिल्मीस्तान स्टुडिओत ‘देवा’चे पहिले चित्रीकरण सत्र सुरु तर झाले, पण ‘सेटवर पत्रकार, पाहुणे यांना प्रवेश नाही’ असा दरवाजावरचा फलक वाचून निराशा झाली. ‘देवा’च्या रुपातील बीग बीचा खास ड्रेस ‘लीक’ होऊ नये म्हणून ही काळजी होती म्हणे. काही दिवसांनी धक्कादायक बातमी आली. सुभाष घईने पहिलेच चित्रीकरण सत्र पूर्ण व्हायच्या आतच ‘देवा’ डब्यात ठेवून ‘राम लखन’ची निर्मिती करायचे ठरवलयं. असेलही कदाचित. अमिताभ म्हटलं की रेखा आलीच. या जोडीच्या ‘पडद्यावर न आलेल्या चित्रपटां’ची गंमत गोष्ट वेगळीच आहे. आता हेच बघा ना, गाणे एक अथवा सेम टू सेम. रेखादेखील एकच, पण हीरो मात्र दोन. बरं हे हीरो कोण हेही पाहायला हवे. पहिला अमिताभ बच्चन आणि दुसरा संजय खान. नेमका संदर्भ काय असा तुमचा प्रश्न असेलही. अमिताभ व संजय खान एकाही चित्रपटात एकत्र आले नाहीत.
अमिताभचे ते सुरुवातीचे दिवस. तो आहे म्हणजे हमखास पिक्चर फ्लॉप हे कोणाही ज्योतिषाने कुंडली न मांडताही घडत होते. त्याला कसेबसे पिक्चर्स मिळत होते. अशाच ‘पडत्या काळात’ अमिताभला निर्माता व दिग्दर्शक कुंदन कुमारने साईन केले. जोडीला नायिका रेखा. ‘दुनिया का मेला’चे शूटिंग सुरु झाले. चांदिवली स्टुडिओत प्रेम गीताचे शूटिंग ठरले. गाण्याचे बोल, ये चेहरा ये जुल्फे जादू सा कर रहे है
तौबा तौबा… अमिताभ व रेखा यांनी ‘प्रेमाचा अभिनय वठवून’ हे गाणे साकारले. दोन अडीच महिन्यांनी याच चांदिवली स्टुडिओत याच पिक्चरचे आणखीन एक शूटिंग सत्र असल्याने रेखा स्टुडिओत पोहचली तेव्हा तिला ‘आज संजय खानसोबत शूटिंग आहे’ हे समजल्याने आश्चर्याचा फारसा धक्का बसला नाही. तोपर्यंत तरी ‘मी पटकथा वाचून पिक्चर साईन करते’ अशा पोझिशनला ती आली नव्हती. पण आज संजय खानसोबत ‘ये चेहरा ये जुल्फे तौबा तौबा’ याच गाण्यावर ‘प्रेमाचा अभिनय’ करायचाय हे समजताच ती दचकली. आपला हीरो बदललाय हे तिच्या लक्षात आले. ‘दुनिया का मेला’ निर्मितीवस्थेत असताना रेखा बिझी होत गेली आणि चित्रपट रखडत राहिला आणि तो कधी पडद्यावर यावा? तोपर्यंत १९७४ साल उजाडले होते. अमिताभ युग सुरु झाले होते. तोपर्यंत गल्ली गल्लीत बातमी पोहचली होती, याच ‘दुनिया का मेला’मधून अमिताभला काढले आणि संजय खानला घेतले.
अमिताभ व रेखावरच्या त्या गाण्याचे पुढे काय झाले? आता यू ट्यूबचे युग आले आणि हे सेम गाणे अमिताभ व रेखा आणि संजय खान व रेखा या दोघांवरचे गाणे त्यावर उपलब्ध झाले आहे. बघा तर हे दुर्मिळ गाणे. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातच अमिताभला विश्वजीतने ‘रॉकी’ नावाच्या सिनेमासाठी साईन केला होता. या “विश्वजीतची रेखा” त्याची एक फेवरेट हिरोईन होती.
रेखाला विश्वजीतने रॉकीमध्ये अमिताभची नायिका म्हणूनच साइन गेलं. ट्रेड पेपरमध्ये जाहिरातही आली. पण विश्वजीतचा त्यावेळेला अतिशय पडता काळ असल्याने आणि त्याने त्यानंतर अभिनयापेक्षा जास्त लक्ष हेमंत कुमारने आपल्यासाठी जी रुपेरी पडद्यावर गाणी गायली ती गाणी आपण गात गात नवा आर्केस्ट्रा त्याने सुरु केला आणि त्याचा गायक म्हणून उदय झाला. त्यामध्ये ‘रॉकी’ दुर्दैवाने बंद. अरेरे. अलिकडेच काही वर्षांपूर्वी एका पार्टीमध्ये माझी विश्वजीतची भेट झाली असता त्याला माझ्याकडे “रॉकी”ची असलेली जाहिरात आवर्जून दाखवताच तो अगदी थक्क झाला. माझ्याकडे कलेक्शनमध्ये अशा पद्धतीची एक पन्नास बावन्न वर्षांपूर्वीची एखाद्या चित्रपटाची जाहिरात असणं हा त्याच्यासाठी एक प्रकारचा “कल्चरल शॉक” होता. विश्वजीत म्हणाला, मी इम्पात नाव रजिस्टर केले होतं. परंतु चित्रपट बनू शकला नाही. कालांतराने सुनील दत्त यांनी माझ्याकडून आपल्या अजंठा आर्ट्ससाठी ‘रॉकी’ नाव घेतलं आणि संजय दत्तला ‘रॉकी’च्या रुपात रुपेरी पडद्यावर आणले.
अमिताभ व रेखाचा असाच एक चित्रपट निर्माता व दिग्दर्शक कुंदनकुमार याचाच ‘अपना पराया’. हा चित्रपट घोषणेवरच थांबला.
दिग्दर्शक राकेश कुमार हा तसा अमिताभ बच्चनच्या मर्जीतील. राकेशकुमारने चित्रपट जाहीर केला “टायगर”. बच्चनच्या ‘सूडनायक’ इमेजला परफेक्ट नाव. नायिका रेखा. अमिताभ कमालीचा बिझी असल्याने ‘टायगर’साठी तारखाच मिळत नव्हत्या. असा उशीर होत असतानाच मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘कुली’च्या बंगलोर येथील सेटवर अमिताभला अपघात झाला आणि त्याच्या एकूणच वाटचालीचे शेड्यूल बिघडलं आणि त्याच्यामध्ये ‘टायगर’ चित्रपट दुर्दैवाने घोषणेपुरताच राहिला. टीनू आनंद दिग्दर्शित “शिनाख्त”च्या (म्हणजे तपास, पोलीस तपास) मुहूर्ताचे आमंत्रण माझ्या हाती येताच यात अमिताभची नायिका कोण बरे यावर पटकन नजर जाणारच. १९८८ चे अखेरचे दिवस होते आणि माधुरी दीक्षित नाव वाचून अर्थात आनंद झाला. आर. के. स्टुडिओत संध्याकाळी हा मुहूर्त सोहळा रंगला. सेटवर पाऊल टाकताच मालगाडीचा सेट दिसला. मुहूर्ताच्या दृश्यासाठी असा सेट असल्याने कुतूहल वाढले. पटकथा लेखक आणि पत्रकार वसंत साठे यांनी मुहूर्ताचा क्लॅप देताच सेटवर शांतता पसरली. त्या मालगाडीत जखमी अवस्थेतील आणि अंगावर रक्त सांडलेल्या अमिताभला साखळदंडाने बांधलयं आणि गाडी वेगाने धावतेय असे दृश्य होते (वेगाचा फिल अर्थात ट्रीक सीन) आणि अशातच माधुरी येते, अमिताभला भावतिरेगाने मिठी मारते आणि त्याला समजावत म्हणते, आपण अतिशय निर्धाराने गुन्हेगारांचा पाडाव करु वगैरे वगैरे बरेच काही. या चित्रपटाची दुसरी नायिका माधवीदेखील फोटोसाठी आली. रजनीकांत आला.
अमिताभसोबत चित्रपट मिळाल्याने माधुरी प्रचंड खुश होती. एक तर तिच्या करियरचा हा पहिलाच टप्पा होता आणि अमिताभ नायक म्हणून लाभणे हे जणू आयुष्यातील सर्वात सुंदर स्वप्न पूर्ण होण्यासारखे होते. या सेटवरच माधुरीला भेटलो असता तिचा एकूणच फिल गुड काय बोलू नि किती बोलू असाच होता. अहो, तिचा कायमच हसरा चेहरा इतकं आणि असे काही बोलत होता की ते भाव आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत, पण अमिताभच्या अनेक चित्रपटांप्रमाणेच हा ‘शिनाख्त’ही मुहूर्तानंतर काही दिवसातच कायमचा बंद पडला. इंद्रकुमार दिग्दर्शित ‘रिश्ता’ ( १९९४) या नावाचा एक चित्रपट बनणार होता. अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका भव्य पार्टीत याचे आयोजन करण्यात आले होते. अमिताभ, माधुरी आणि आमिर खान अशी स्टार कास्ट. तोपर्यंत माधुरी हिंदी चित्रपटसृष्टीतील नंबर वनची अभिनेत्री बनली होती. अमिताभसोबत चित्रपट म्हणजे आमिरलाही सही मौका होता आणि काही दिवसांनी बातमी आली की हा चित्रपट मुहूर्तालाच बंद पडला. एकदा ट्रेड पेपरमध्ये बातमी आली, यश चोप्रा दिग्दर्शित एका नाव न ठरलेल्या चित्रपटात अमिताभ व माधुरी पती पत्नीच्या भूमिकेत आणि अभिषेक बच्चन त्यांच्या मुलाच्या भूमिकेत…. बातमी चांगलीच होती. अशी कुजबुज सुरु झाली की अभिषेकच्या आईची भूमिका साकारण्याइतपत आपण मोठ्या झालो आहोत असे माधुरीला वाटत नव्हते.
ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस अंधेरीतील नटराज स्टुडिओत मी रिपोर्टींगसाठी सेटवर गेलो तेव्हाचे दोन चित्रपट आजही आठवताहेत. एक होता, जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बंधुआ’ (त्यात वहिदा रेहमान नायिका). धर्मेंद्रने मुहूर्त क्लॅप दिला होता. दुसरा होता रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘राम की सीता श्याम की गीता, विशेष उल्लेखनीय गोष्ट या चित्रपटात अमिताभ व श्रीदेवी या दोघांचीही दुहेरी भूमिका होती. आणि आपल्या अजय वढावकरला मुहूर्त दृश्यात संधी मिळाल्याने तो केवढा तरी सुखावला होता. अनेक वर्ष तो या मुहूर्ताची आठवण काढायचा आणि भावूक व्हायचा. हे चित्रपट बंद पडले. नटराज स्टुडिओतच सत्तरच्या दशकात मुशीर रियाझ निर्मित आणि शक्ती सामंता दिग्दर्शित ‘आरपार’ या चित्रपटात दसऱ्याच्या दिवशी मुहूर्त झाला. शशी कपूर, अमिताभ, झीनत अमान व नीतू सिंग यांच्या भूमिका आणि राहुल देव बर्मनचे संगीत. चित्रपटाचे शूटिंगही सुरु झाले पण पुढे प्रगती नाही. मनमोहन देसाई व अमिताभ बच्चन ही दिग्दर्शक व अभिनेता सुपरहिट जोडी. सुभाष देसाई निर्मित ‘सरफरोश’ या जोडीचा असाच एक चित्रपट. अमिताभला वेगळाच गेटअप होता. ते फोटो पाहूनच इम्प्रेस व्हायला होई. परवीन बाबी नायिका होती. सहा सात रिळांच्या शूटिंगनंतर हाही चित्रपट बंद पडला. परवीन बाबी मानसिक शांततेसाठी अचानक विदेशात गेल्याचा या चित्रपटाला फटका बसल्याचे गॉसिप्स गाजले.
ऐंशीच्या दशकात एस. रामनाथन दिग्दर्शित ‘रुद्र’ या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या आमंत्रणानुसार वांद्य्रातील मेहबूब स्टुडिओत पोहचलो ते थेट श्री शंकराच्या देवळाचा अतिशय उत्तम सेट लावला होता. अमिताभ देवाशी बोलतोय असा ‘दीवार’च्या गाजलेल्या प्रसंगाची आठवण येत होती. बरेच दिवस या ‘रुद्र’ची चर्चा होत राहिली इतकेच. हा चित्रपट बंद कधी पडला हे समजलेच नाही. मेहबूब स्टुडिओतच अमिताभ व मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कंवल शर्मा दिग्दर्शित ‘लव कुश’ या चित्रपटाचा मुहूर्त झाला. पुढे काहीच नाही. चेतन आनंद दिग्दर्शित ‘सलिम अनारकली’ (अमिताभ, सलिम आणि प्रिया राजवंश अनारकली. आपण वाचलो म्हणूया का?), सुलतान अहमद दिग्दर्शित ‘तू भी सच्चा मै भी सच्चा’ (कल्याणजी आनंदजी यांचे संगीत होते), साधु संत (या चित्रपटात अमिताभसोबत मिथुन चक्रवर्ती व अमृता सिंग होते. पण पोस्टरवर दिग्दर्शकाचे नावच नाही. समजून जा काय ते). राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘रणवीर’ (मला आठवतंय विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अमिताभने आपल्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त हिंदी चित्रपटसृष्टी व मीडियासाठी जंगी पार्टी आयोजित केली होती. त्यात या चित्रपटाचा मुहूर्त झाला. अमिताभच्या जोडीला संजय दत्त व अभिषेक बच्चन होते.) राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘द आऊटसायडर्स्’ आणि ‘पॉवर’ हेदेखील चित्रपट बंद पडले. ‘पॉवर’मध्ये अमिताभसोबत अनिल कपूर, संजय दत्त, अमिषा पटेल होते. यश चोप्रा निर्मित यशराज फिल्मचा प्राण मेहरा दिग्दर्शित ‘जिंदगी के रंग’ (अमिताभसोबत परवीन बाबी आणि पाहुणी कलाकार शर्मिला टागोर)चा परेलच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत अतिशय भव्य दिमाखदार मुहूर्त झाला.
चित्रपट पावपट होताच परवीन बाबी बेपत्ता होताच या चित्रपटाचा पत्ता कट. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘आलिशान’चा जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उंची खाना पिनासह जोरदार मुहूर्त झाला. पुढे काहीच नाही. सुनील सिकंद दिग्दर्शित ‘करिश्मा’ चार रिळांनंतर बंद पडला. शशी कपूर, शर्मिला टागोर, अमिताभ, परवीन बाबी, डॅनी डेन्झोपा, इफ्तेखार यांच्या भूमिका होत्या. कादर खानने पटकथा, संवाद व दिग्दर्शन असे एकदम करीत अमिताभला ‘कायर’ची शीर्षक भूमिका दिली. पण मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘कुली’ (१९८३)च्या बंगलोर येथील सेटवरील जखमेने अमिताभला सहा महिने आराम करावा लागल्याने ‘कायर’ कागदावरच राहिला. राकेशकुमारचा ‘शिवा’ त्यात सापडलाच. त्यात नायिका परवीन बाबी आणि या सगळ्यात एकदम वेगळा चित्रपट ठरला असता ‘पुराना पापी’. देव आनंद निर्मित, दिग्दर्शित व अभिनीत चित्रपटात अमिताभ बच्चन. पक्की व्यावसायिकता दाखवत अमिताभने हा चित्रपट स्वीकारला पण दुर्दैव.
याशिवाय ‘चार्ली’ (पद्मिनी कोल्हापूरे नायिका), राम तलवार निर्मित व चंद्रा बारोट दिग्दर्शित नाव न ठरलेला चित्रपट (झीनत अमान नायिका) वगैरे चित्रपट आहेत. खुद्द अमिताभला यातील किती चित्रपट आठवत असतील हा प्रश्न आहे. बीग बीचे दोन चित्रपट प्रदर्शनास सज्ज होऊनही पडद्यावर आलेच नाहीत. एस. रामनाथन दिग्दर्शित ‘जमानत’ आणि सूरजीत सरकार दिग्दर्शित ‘Shoedite’. हा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने अमिताभ फारच हळहळल्याचे वृत्त होते आणि असणारच. यात तो वृद्धाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट आता प्रदर्शित होत आहे अशी असलेली बातमी हा चित्रपट
पडद्यावर आला तर खरी ठरेल.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper