Monday , February 6 2023

लाँग मार्चच्या दणक्याने राज्य सरकार नमले!

पनवेल मनपा कर्मचार्‍यांना सेवेत घेण्याचे आश्वासन

मुंबई : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्‍या 320 कर्मचार्‍यांनी लाँग मार्चचा दणका देताच या कर्मचार्‍यांना पनवेल महापालिकेच्या सेवेत एका महिन्यात समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
पनवेल महापालिकेतील कर्मचार्‍यांचे समायोजन करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न केले होते. यासंदर्भात तत्कालीन मंत्र्यांबरोबर बैठकाही झाल्या होत्या, मात्र राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर निर्णय प्रक्रिया ठप्प झाली होती. अखेर संतप्त मनपा कर्मचार्‍यांनी बुधवारी (दि. 22) पनवेल ते मंत्रालय असा लाँग मार्च काढला होता. या लाँग मार्चला आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुभेच्छा देऊन आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली होती.  
लाँग मार्चने हादरलेल्या राज्य सरकारने पनवेल मनपा कर्मचार्‍यांना चर्चेसाठी मंत्रालयात पाचारण केले. या अनुषंगाने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कर्मचार्‍यांची बैठक झाली. या बैठकीला राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, अन्य नेते आणि पनवेल कर्मचारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींचा महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश झाला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये वर्षानुवर्षे काम करीत असणार्‍या 320 कर्मचार्‍यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेऊन त्यांना पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी पनवेल कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्यावर या कर्मचार्‍यांना महिनाभरात सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन ना. शिंदे यांनी या वेळी दिले.
महापालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा याबाबत कर्मचारी संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले. त्यावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही ना. शिंदे यांनी या वेळी सांगितले. आता ही सर्व आश्वासने कधी पाळली जातात, याकडे मनपा कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply