मुहब्बत का नाम आज भी मुहब्बत है… यह ना कभी बदली है और न कभी बदलेगी…
अगर यह तुम्हे प्यार करती है तो यह पलट के देखेगी…
पलट… पलट
तुम्हारी जैसी लडकी के साथ मेरे जैसे लडके का होना बहुत जरुरी है…
राज मल्होत्रा (शाहरुख खान) व सिमरन सिंह (काजोल) यांची इंग्लंडमधील निसर्ग सौंदर्यात छोट्या छोट्या गोष्टीतून खुलत- फुलत रंगलेली आणि मग पंजाबमधील गुडगाव येथील सरसो की खेतीमध्ये छान क्लायमॅक्सकडे वळलेली ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगी’ची थोडी मस्ती, थोडी खट्टी प्रेम कथा नक्कीच आठवली असणार…
आपल्या देशात आवडलेला चित्रपट फक्त आणि फक्त पडद्यावर राहत नाही, तो चित्रपट रसिकांच्या मनात, हृदयात, डोक्यात फिट्ट घट्ट बसतो.
याच ट्रेन्ड सेटर चित्रपटावर पुन्हा एकदा नव्याने ‘फोकस’ टाकायचा, तर विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, पण काही विक्रम चक्क चक्रावून टाकणारे असतात…
यशराज फिल्म्सचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ ( प्रदर्शनाची तारीख २० ऑक्टोबर १९९५) आजही म्हणजे एकतीस वर्षानंतरही दक्षिण मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात चक्क १४००पेक्षाही जास्त आठवड्यात मॅटीनी खेळास दाखवला जातोय व थोडे फार का असेनात त्याला प्रेक्षक असतात. न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात पहिला पन्नास आठवड्यांचा प्रवास केल्यावर ‘डीडीएलजे’ मराठा मंदिरला मॅटीनी शोला आला. मॅटीनी शोची तोपर्यंत आपली एक ओळख व परंपरा होती. मॅटीनी शोचं आपलं एक व्यक्तिमत्त्व होते, संस्कृती होती. जगभरात कुठेही कोणत्याही भाषेतील चित्रपटाने एखाद्या चित्रपटगृहात दीर्घकालीन मुक्काम नक्कीच केला नसावा व यापुढेही ते कदापि शक्य नाही. खरंतर एकादा यशस्वी चित्रपट पंचवीस, पन्नास (काही तर त्याहीपेक्षाही जास्त) आठवडे एकाद्या चित्रपटगृहात मुक्कामाला राहण्याची संस्कृती आपलीच! साठ व सत्तरच्या दशकात तर अनेक चित्रपटांनी असे रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी आठवड्याचे यश मिळवून जोरदार पार्ट्या साजऱ्या करून स्टार्सना ट्रॉफीजही दिल्यात, पण एकतीस वर्षांची वाटचाल म्हणजे, अबब असेच म्हणायला हवे. असं असूनही हा चित्रपट आपल्याला अजिबात आवडला नाही असे म्हणणारेही आहेत. असं अनेक सुपर डुपर हिट चित्रपटाच्या बाबतीत घडते-बिघडते.
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (मुंबईतील प्रदर्शनाची तारीख १५ ऑगस्ट १९७५)चा विक्रम कोणी कधी मोडेल असे वाटले नव्हते. मिनर्व्हात ‘शोले’ने दिवसा तीन खेळ असा ३१ ऑगस्ट १९७८ असा तीन वर्षे सलग, तर त्यानंतर त्यापुढे तेथेच मॅटीनीला आणखीन दोन वर्षे खणखणीत मुक्काम केला तेव्हा ‘आठवड्याच्या आकड्यांचा विक्रम’ कोणी कधी मोडेल असे वाटले नव्हते, पण ‘डीडीएलजे’ने त्याबाबत ‘शोले’वर मात केली असली तरी आजही ‘शोले’चे सामाजिक अस्तित्व जाणवतेय. त्यात मूळ क्लायमॅक्स समाविष्ट करून तो पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला. नवीन तंत्रज्ञानयुक्त ‘शोले’चा आजही जगातील विविध देशांमध्ये भव्य प्रीमियर आयोजित करण्यात येत आहे.
‘डीडीएलजे’ आला तेव्हा आपल्या देशात व्हिडीओ संस्कृती खोलवर स्थिरावली होती (१९८२च्या एशियाडच्या वेळेस आपल्या देशात व्हिडीओचे आगमन झाले व सिनेमा कॅसेटच्या रूपाने जणू मुठीत आला), एव्हाना उपग्रह वाहिन्यांही घराघरात चोवीस तास माहिती व मनोरंजनाचा जणू स्फोट झाला होता. घराचे फक्त चित्रपटगृहात रूपांतर व्हायचे शिल्लक होते. (कालांतराने होम थियेटर ही संकल्पना रूजली. त्याची सुरुवात याच टप्प्यावरची).
‘डीडीएलजे’च्या आगमनास पूरक वातावरण निर्माण करण्याचे श्रेय ‘हम आपके है कौन’ ( ९ ऑगस्ट १९९४)ला द्यायला हवे. त्याने मधल्या काळात चित्रपटगृहापासून दुरावलेला सहकुटुंब सहपरिवार चित्रपट पाहणारा वर्ग पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणला. फरक इतकाच की आता ‘महाग ते चांगलेच’ अशी मानसिकता असणारा समाजातील उच्च मध्यम व त्यावरचा हा रसिक होता. मल्टिप्लेक्स युगाचा प्रारंभ होण्यापूर्वीचे हे दिवस होते, पण त्याकडे आपण वळू याचा जणू संकेत ‘डीडीएलजे’ने दिला. याच टप्प्यावर इंग्लंड- अमेरिकेत उच्च शिक्षण व नोकरीला जाण्यास वेग आला. विदेशातील अनिवासी भारतीयांची पुढची पिढी वयात आली होती. आपल्याकडे ग्लोबलायझेशन रूजत होते. आणि याच वातावरण ‘डीडीएलजे’ ऐन दिवाळीत आला. त्याच्या स्पर्धेत प्रदर्शित झालेले डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘याराना’ (अमिताभवाला नाही. ऋषि कपूर व माधुरी दीक्षितचा) आणि देव आनंदचा ‘गॅन्गस्टर’ हे चित्रपट केव्हाच इतिहासजमा झालेत.
यशराज फिल्म्सने या चित्रपटापासून जणू कात टाकलीय व आजही त्याचे सकारात्मक परिणाम दिसताहेत. आपले मोठे बंधू बी.आर. चोप्रा यांच्या सावलीतून बाहेर पडत यश चोप्रा यांनी स्वतःचे यशराज फिल्म्स हे बॅनर स्थापन केले तेव्हा व्ही. शांताराम यानी आपल्या राजकमल कलामंदिरमध्ये यशजींना कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली. यश चोप्रा दिग्दर्शित ‘दाग’ (राजेश खन्ना व शर्मिला टागोर. १९७३) हा या बॅनरचा पहिला चित्रपट. डीडीएलजेच्या निर्मितीच्या वेळेस यशजींचा मोठा मुलगा आदित्यने चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि यशराज फिल्म्सचा कारभार अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा येथे नेले. (कालांतराने तेथे अद्ययावत यंत्रणेसह भव्य स्टुडिओही उभारला.)
‘डीडीएलजे’पूर्वी शाहरुख व काजोल जोडीचे ‘बाजीगर ‘ व ‘करण अर्जुन’ रौप्य महोत्सवी यशस्वी होते, तर शाहरुखने यश चोप्रांच्या ‘डर’मध्ये क…. क…. किरण असे सतत म्हणत साकारलेली खलवृत्तीची भूमिका रसिकांत प्रचंड लोकप्रिय झाली होती. ‘बाजीगर’मधीलही त्याचे व्यक्तिमत्त्व खुनशीच होते.
याच पाश्वभूमीवर ‘डीडीएलजे’तील त्याचा रोमॅन्टिझम कसा बरे स्वीकारला जाईल अशीच काहीशी शंका होती, पण ‘डीडीएलजे’ प्रदर्शित झाला आणि जणू सगळ्यांच्याच प्रश्नांना चोख उत्तर देत एक नवे पर्व सुरु झाले. अतिशय तजेलदार, एनर्जेटिक व जवळपास संपूर्ण पडदा व्यापून टाकणारा शाहरुख खान यात पाह्यला मिळाला. ( त्यानंतर २००४ सालचा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेश’ आणि २००७ सालचा शिमित अमिन दिग्दर्शित ‘चक दे इंडिया’ वगळता तो याच प्रतिमेत अडकला हा भाग वेगळा) आणि काजोलची त्याला तितकीच खट्याळ, चुलबुळी, खोडकर साथ (यानंतरही अनेक चित्रपटात यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री जमली आणि व्यक्तिगत आयुष्यातही ते छान मित्र म्हणून ओळखले जाताना त्यांच्याबद्दल भलतंसलतं गॉसिप्स झाले नाही हे विशेष)
यासह अनेक कलाकारांतील जरा हटके नावे सांगायची, तर शाहरुखच्या मित्राच्या भूमिकेतील करण जोहर. तो त्याच वेळेस आदित्यचा सहाय्यकदेखील होता. तेव्हाचे दिग्दर्शनीय धडे त्याला उपयुक्त ठरलेत, तर यातील मंदिरा बेदीला आपण नंतर क्रिकेटच्या मैदानावर वा समालोचक म्हणून पाहिले. तेव्हा याच चित्रपटातील बडे बडे शहरो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है हा संवाद आठवला.
आनंद बक्षींच्या गीताना जतिन ललितचे संगीत आणि त्यातून आजही गोडवा जपून असणारी सुमधूर गाणी या चित्रपटाला तिसऱ्या पिढीत घेऊन आलीत. मेरे ख्वाबो में तुम आये….आनंद बक्षींनी चक्क चोवीस वेळा लिहिले तेव्हाच त्यात जान आलीय. यशराज फिल्म्सच्या परंपरेला साजेशीच अशी ही गाणी आहेत. तुझे देखा तो यह जाना सनम…, होगा गया है तुझको तो प्यार सजना… कोणतेही ऐका/पहा तल्लीन व्हा. नेत्रसुखही भरभरून आहे. झळझळीत मनोरंजनाचे युग तेव्हाच सुरू झाले. एमटीव्ही व डिस्कव्हरी वाहिन्या शहरी रसिकांची रूची बदलत होत्या आणि तेव्हाच मुख्य प्रवाहातील चित्रपट बदलू लागला.
हिंदी चित्रपटाचा अभ्यास करताना ‘शोले’पूर्वीचा व नंतरचा असा भाग केला जातो. त्यात ‘शोले’ ते ‘डीडीएलजे’ आणि नंतर असाही एक प्रवास सुरू आहे म्हणूनच तर ही दखल… २० ऑक्टोबर आला की ‘डीडीएलजे’ हमखास आठवतो आणि त्यानिमित्ताने त्या दिवशी मराठा मंदिर चित्रपटगृहाला भेट देणं होते. तेव्हा काही वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी कॅमेरा घेऊन आलेले भेटतात. म्हणजेच आजही या चित्रपटाची न्यूज व्हॅल्यू कायम आहे
आणि हेदेखील एक यशच.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper