केंद्राकडून मोठा दिलासा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वांत जास्त प्रभावित झालेल्या प्रवासी मजुरांसाठी गुरुवारी (दि. 14) केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे देशातील आठ कोटी प्रवासी मजुरांना पुढील दोन महिने मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. पुढील दोन महिने प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ आणि एका कुटुंबाला एक किलो डाळ दिली जाईल. यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांचे विक्रमी पॅकेज जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. हे मोफत अन्नधान्य कोणाला द्यायचे याचा निर्णय राज्य सरकारला करावा लागणार आहे. योजना राज्य सरकारच्या माध्यमातून
राबवली जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याचा देशातील आठ कोटी प्रवासी मजुरांना फायदा होणार आहे.
देशातील 23 राज्यांतील 67 कोटी लोकांचा समावेश ’एक देश, एक रेशनकार्ड’ या अंतर्गत करण्यात आला आहे. यामुळे देशातील 83 टक्के लोकांकडे रेशनकार्ड आहे. ही योजना ऑगस्ट 2020पासून लागू केली जाणार आहे. मार्च 2021पर्यंत सर्वांना या योजनेमार्फत जोडले जाणार असून त्यामुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला अन्य राज्यात त्याच्या वाटणीचे धान्य मिळू शकेल. मोदी सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत झाल्याचे राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
RamPrahar – The Panvel Daily Paper