Breaking News

कोरोनाशी दोन हात!

सर्वत्र आपली दहशत निर्माण केलेल्या कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडून काहींचा दुर्दैवी मृत्यू होत असताना दुसरीकडे या महामारीवर यशस्वीपणे मात करणार्‍यांचेही प्रमाण वाढू लागल्याचे पहावयास मिळत आहे. रुग्ण बरे होणे ही आताच्या असुरक्षित व भीतीयुक्त अशा वातावरणात दिलासादायक बाब म्हटली पाहिजे.

काही देशांचा अपवाद वगळता जगभरातील बहुसंख्य राष्ट्रांना सध्या कोरोनारूपी महाभयंकर संकटाचा सामना करावा लागत आहे. पृथ्वीवरील सात खंड आणि त्यातील लाखो लोक अचानक उद्भवलेल्या या आपत्तीने अक्षरश: हादरले आणि पुरते कोलमडलेही आहेत. आपल्या देशातही कोरोनामुळे विपरित परिणाम झाल्याची स्थिती आहे. जीवनचक्र पुन्हा फिरण्यासाठी लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली असताना, 18 मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर होण्याचे संकेत मिळाले आहेत. आगामी काळातही अशाच प्रकारे जीवनशैलीत परिस्थितीनुरूप बदल करून जगावे लागणार आहे.

कोरोना विषाणूचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात फैलाव वाढत आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना तसेच ज्यांना याआधीच एखादा आजार, व्याधी, विकार जडलाय त्यांना अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा लोकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसे पाहिले तर सध्याच्या घडीला प्रत्येकानेच स्वत:सह आपल्या कुुटुंबाप्रति आणि एकूणच समाजाच्या दृष्टीने दक्ष राहणे हिताचे आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढून यातील काहींचे जीवन जगण्याचे प्रयत्न असफल होत असताना दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याचे सुखद चित्र दिसून येते. अगदी लहान मुलांनीही कोरोनाविरुद्धची लढाई जिंकलेली आहे. आपल्या रायगड जिल्ह्याचेच उदाहरण द्यायचे झाले तर कालपर्यंत जिल्ह्यात एकूण 131 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 100, पनवेलच्या ग्रामीण भागातील 14, श्रीवर्धन तालुक्यातील पाच, उरणमधील सात, कर्जतचे तीन, पोलादपूर आणि खालापूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अशा प्रकारे कोरोनावर मात करता येते, हे स्पष्ट झाले आहे, पण म्हणून एकदम निर्धास्तही राहून चालणार नाही, कारण एखादे छोटेसे चुकीचे पाऊलही स्वत:सह इतरांसाठी महागात पडू शकते. 

विविध देश कोरोना प्रतिबंधक लस, औषध तयार करण्याच्या अनुषंगाने युद्धपातळीवर संशोधन करीत आहेत, मात्र त्यात अद्याप यश आलेले नाही, शिवाय या विषाणूचा जगभर झालेला संसर्ग पाहता तो लगेचच व सहज आटोक्यात येईल, असे सांगता येत नाही, पण म्हणून सारे काही संपलेले नाही. कोरोनाला मात देण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी काही दुर्धर आजारांवर वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी उपचार शोधून काढले आहेत, तर काही असाध्य विकारांचे समूळ उच्चाटन करणे मात्र अनेकदा अवघड होऊन बसते. एड्सवर तर आजतागायत उपाय सापडलेला नाही. त्यात आता कोरोनाची भर पडलीय. हा विषाणू संसर्गजन्य असल्याने धोका अधिक आहे. अशा वेळी मास्क बांधणे, सॅनिटायझर वापरणे व सोशल डिस्टन्सिंग राखणे या त्रिसूत्रीचे पालन करून मार्गक्रमण करणे इष्ट ठरेल.

-समाधान पाटील (9004175065)

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply