Breaking News

महाड बाजारपेठेत अग्नितांडव; लाखोंचे नुकसान

महाड ः प्रतिनिधी – महाड बाजारपेठेतील चामुंडा एनएक्स या कापड दुकानाला रविवारी (दि. 17) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने दुकानातील मालासह संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, नगर परिषद, महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन पथकाने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

महाड शहरातील महात्मा गांधी मार्गावर प्रमुख बाजारपेठेत प्रकाश विरचंद यांचे चामुंडा एनएक्स नावाचे कापड दुकान आहे. लॉकडाऊन असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून दुकान बंद ठेवण्यात आले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमाराला दुकानाच्या प्रमुख दरवाजातून धूर येण्यास सुरुवात झाली. थोड्याच वेळामध्ये आगीने रौद्र रूप धारण केले. या दुकानाला लागून अन्य दुकाने असून बहुतांश दुकानांच्या इमारती जुन्या आणि लाकडाचा वापर अधिक करण्यात आलेल्या असल्याने या दुकानांना आगीची झळ पोहचल्यास संपूर्ण बाजारपेठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास महाड एमआयडीसी आणि नगर परिषदेचे अग्निशमन पथक घटनास्थळी रवाना झाल्यानंतर दोन तासांच्या अथक प्रयत्नांतून आग नियंत्रणात आणण्यात यश आले. आग विझविण्याकामी दोन खासगी टँकरचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनीदेखील आग विझविण्यासाठी मदत केली. आगीमुळे दुकानातील सर्व कापडी माल जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply