पाली ः प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील महिला वकिलाचा घराच्या वादातून हात पिळत, मारहाण व अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग करण्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 12) शिळोशी येथे घडली. या महिला वकील सध्या मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत आहेत. या प्रकरणी संबंधितांना तत्काळ अटक न केल्यास पोलीस स्थानकासमोर आत्मदहन करण्याचा इशारा महिला वकिलाने दिला आहे.
महिला वकील मार्च महिन्यात गावी आल्या असता त्यांना घरातील कपाट फोडून लाखोंचा ऐवज लंपास झाल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन पाली येथे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी 26 मार्चला याबाबत गुन्हा नोंदविला. त्यानंतर महिला वकिलाने हा दावा दिवाणी न्यायालयात दाखल केला आणि सदर वाद असलेल्या जागेवर बांधकाम चालू असल्यामुळे तशी तक्रार पोलीस स्टेशन पाली येथे केली. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये संचारबंदी असताना त्याचा गैरफायदा घेत त्यांच्या नातेवाइकांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकाशी संगनमत करून शिळोशी गावात इतर गावातून 10 ते 15 मजूर अवैध बांधकामावर काम करीत असल्याचे पोलिसांच्या नजरेस आणून दिले.
याचा राग धरून बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी विचारणा करण्यासाठी आलेल्या महिला वकिलाशी सात-आठ जणांनी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच त्यांना धमकावत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याबाबतची तक्रार वकील महिलेने पाली पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याची दखल घेत भा. दं. वि. 143, 147, 354, 323, 294, 504, 506 व म. पो. अधि. कलम 37(1), 3, 103 अन्वये सुनील शिर्के, प्रतीक शिर्के, स्वप्नाली शिर्के, नितेश वाडकर, मानसी वाडकर, नारायण पांगारे व संतोष मांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित वकील महिला शिळोशी येथील एक महिला व चार पुरुषांपासून आपल्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षणाची मागणी पोलिसांकडे करणार आहे. संबंधितांना तत्काळ अटक करून कार्यवाही न केल्यास पोलीस स्टेशनसमोर आत्मदहनाचा इशाराही वकील महिलेने दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संतोष साळुंखे करीत आहेत.
मारहाणप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा
माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील धरणाची वाडी येथे झालेल्या भांडणाची पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून संगनमताने जमाव जमवून मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी नऊ जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 मे रोजी सकाळच्या सुमारास फिर्यादी विजय चंद्रकांत दळवी (31) यांच्या घरासमोर घडली.
फिर्याद विजय दळवी हे सकाळी त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत निळज ता. माणगाव येथील घर नं. 179 या ठिकाणी घरालगत असलेली गोबर गॅसची व शौचालयाची जुनी टाकी काढून नवीन टाकी बसविण्याचे काम करीत होते. या वेळी फिर्यादीने माणगाव पोलीस ठाणे येथे 14 मे रोजी झालेल्या भांडणाबाबत तक्रार दिल्याचा राग धरून राजेंद्र जाधव, अविनाश जाधव, सुरेंद्र जाधव, महेंद्र जाधव, हर्ष, विद्या जाधव, प्रतीक जाधव यांनी संगनमत करून फिर्यादी विजय दळवी व त्यांच्या आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत दुखापत केली. तसेच फिर्यादी या आरोपींविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे येथे त्यांचे काका सुरेंद्र दळवी यांच्यासोबत जाताना धरणाची वाडी येथील अमोल जाधव व बंटी जाधव हे मुंबई-गोवा महामार्गावरून मोटरसायकलने येऊन फिर्यादीला मारहाण करून धमकी दिली.
या प्रकरणी नऊ जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. र. नं 86/2020 भा. दं. वि. कलम 143, 147, 149, 341, 427, 323, 324, 504, 506,188, 269, 270 महाराष्ट्र पो. अधिनियम 1951,37(1), 135, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005चे कलम 51 ब, महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2020चे कलम 11प्रमाणे साथीचे रोग अधिनियम 1897चे कलम 2, 3, 4प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बुरुंगले करीत आहेत.