पनवेल : प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे रायगड जिल्हा, नवी मुंबईत अडकलेल्या मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशा राज्यातील तब्बल 15 हजार 104 मजूर, व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही रवाना करण्यात आले. आतापर्यंत मध्य प्रदेशकरिता पाच, झारखंड व उत्तरप्रदेशसाठी दोन, तर बिहार व ओडिशाकरिता प्रत्येकी एक रेल्वेगाडी सोडण्यात आली आहेत. स्वत:च्या राज्यात, गावाकडे, घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी शासन आणि प्रशासनाला धन्यवाद दिले.
कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध राज्यांतील काही मजूर महाराष्ट्रात अडकले होते. मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशा येथील काही मजूर व व्यक्ती रायगड जिल्ह्यातही अडकले होते. जिल्हा प्रशासन या मजुरांची व्यवस्थित काळजी घेत होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर मात्र या नागरिकांकडून त्यांच्या स्वगृही जाण्याची मागणी जोर धरू लागली. त्यानंतर विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओडिशा या पाच राज्यांतील प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून समन्वयाबाबतचे नियोजन केले.
रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यांना स्वगृही जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले. या सर्वांना नवी मुंबई परिसर व रायगड जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून पनवेल रेल्वे रेल्वेस्थानक येथे बसने आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय रेल्वेने जाणार्या या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सल, मास्क, साबण, सॅनिटायझर देण्यात आले होते. रेल्वे विभागानेदेखील रेल्वेगाडी सॅनिटाईझ करणे व रेल्वे स्थानकावर निर्जंतूकीकरण फवारणीची उत्तम व्यवस्था केली होती. गावी जायला मिळत असल्याने या सर्वांच्या चेहर्यावर समाधान व ओढही होती. शेवटी रेल्वे निघतानाही या प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर उपस्थित प्रत्येकाचे टाळ्या वाजवून आभार मानले.
Check Also
मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …
RamPrahar – The Panvel Daily Paper