मुंबई : कोकणातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे, तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणे व त्या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याच्या दृष्टीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील भाजपचे आमदार मंगळवार (दि. 19)पासून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे आमदार सर्वश्री भाई गिरकर, प्रसाद लाड, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, निरंजन डावखरे, नितेश राणे, रमेश पाटील या दौर्यात सहभागी होणार आहेत. कोकणच्या दौर्याची सुरुवात रायगड जिल्ह्यापासून कामोठे येथील एमजीएम रुग्णालय येथून सकाळी 9.30 वाजता होणार आहे. या रुग्णालयाला भाजप नेते व आमदार भेट देणार आहेत. यानंतर सकाळी 11 वाजता रायगडचे जिल्हाधिकारी व अन्य शासकीय अधिकार्यांशी चर्चा करण्यात येईल. तेथून 11.45च्या सुमारास कोन येथील गावी सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. दुपारी 1.15च्या सुमारास पेण येथील गणेश मूर्तिकारांची भेट घेऊन कोरोनामुळे निर्माण झालेल्या त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येईल. या ठिकाणी आमदार रविशेठ पाटील उपस्थित राहणार आहेत. तेथून महाड येथील प्रांताधिकार्यांशी कोरोनोच्या परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यात येईल.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीची सर्व अधिकार्यांशी चर्चा करुन सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे तसेच या तीनही जिल्ह्यांत असलेली जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व सध्या सुरू असलेल्या आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे कोरोनाची गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हास्तरावरील स्थानिक प्रशासनाला अधिक मदतीची आवश्यकता असल्यास आमदार निधीतून मदत उपलब्ध करुन देण्याची तयारी आहे. संबंधित जिल्ह्यात त्या-त्या ठिकाणी आवश्यक मदत आमदार निधीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या सध्याची परिस्थितीत अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणण्यासाठी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने भाजपच्या वतीने संबंधित जिल्हाधिकार्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे.
Check Also
कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक
कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …
RamPrahar – The Panvel Daily Paper