लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
खोपोली ः बातमीदार
येथील नगरपालिका नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) होणार आहे, परंतु त्याच्या पूर्वसंध्येलाच गुरुवारी (दि. 11) खोपोली पालिका बांधकाम विभागातील अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात नगरपालिकेतील बांधकाम उपठेकेदारांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पळताळणी झाल्यावर गुरुवारी दुपारी नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने नगरपालिका कार्यालयात येऊन ही कारवाई केली. यात बांधकाम विभागातील अभियंता शशिकांत दिघे यांच्याविरोधात 75 हजारांची लाच घेण्याचा आरोप करण्यात आला असून, यासंदर्भात संध्याकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. संपूर्ण चौकशी झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक नियमानुसार सदर दोषी अभियंता शशिकांत दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
यासंदर्भात चौकशी सुरू असल्याने नेमकी कोणती कारवाई होणार याबाबत पथकाकडून स्पष्टपणे माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंध पथकाने केलेल्या कारवाईसंदर्भात चौकशी सुरू आहे. सदर अभियंत्याकडून लाच स्वीकारण्याबाबत त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे.