माणगाव : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणवासीयांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ती लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी नुकसानग्रस्तांना संकटकाळात सर्वतोपरी पाठबळ देणे आवश्यक असल्याची स्पष्ट भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी (दि. 12) येथे मांडली.
कोरोना या वैश्विक संकटाने त्रस्त असलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यावासीय नैसर्गिक आपत्तीमुळे दुहेरी संकटात सापडले आहेत. किनारपट्टीसह कोकणातील लोकांचे चक्रीवादळात प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ना. आठवले शुक्रवारी (दि. 12) रायगड जिल्हा दौर्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी माणगाव येथे पत्रकारांशी
संवाद साधला.
ना. आठवले यांनी सांगितले की, 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील सुमारे 1900 गावे बाधित झाली आहेत. जिल्ह्याचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे. कोकणात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्य शासनाने जी सरकारी मदत जाहीर केलीय ती अपुरी आहे. शेतकर्यांच्या नष्ट झालेल्या भातशेतीला हेक्टरी एक लाख रुपये सरकारने दिले पाहिजेत. आंबा, नारळ, काजू, सुपारी यांची झाडे मोठी होऊन फळ देण्यासाठी किमान 10 वर्षांचा कालावधी लागतो. अशा नुकसान झालेल्या झाडांच्या बागायतदारांना हेक्टरी मदत न देता प्रत्येक झाडाच्या वर्षभरातील मोबदल्याचा विचार करून सरकारने मदत दिली पाहिजे. दुसरीकडे एक लाख 50 हजार रुपयांत पडलेले घर उभे करणे कोणाला शक्य नाही. यासाठी किमान तीन लाख रुपये राज्य सरकारने दिले पाहिजेत. पडझड झालेल्या घरांना राज्य सरकारने 15 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. ती वाढवून किमान 40 हजारपर्यंत करावी. कोकणात बरीचशी घरे ही पत्रे व कौलांची आहेत. अनेकांच्या घरांवरील पत्रे व कौले उडाल्याचे दृश्य कोकणात पाहणी करीत असताना दिसून आले. त्यामुळे कोकणवासीयांना कौले व पत्रे लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने त्यांच्या बँक खात्यामध्ये तातडीने पैसे जमा करणे आवश्यक आहे.
मान्सूनचे आगमन झालेले आहे. येत्या चार-पाच दिवसांत नियमितपणे पाऊस पडला तर लोकांवरील संकट अधिक वाढणार आहे. ते लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त कोकणाकडे अधिकाधिक लक्ष पुरवून त्यांना योग्य ती मदत सरकारमार्फत केली पाहिजे, मात्र राज्य सरकारचे काम गतीने होताना दिसत नाही. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे त्यांच्यात ताळमेळ नाही. काँग्रेसवाले म्हणतात आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. काँग्रेसच्या आमदारांवर हे सरकार प्रस्थापित झाले आहे. काँग्रेसला जर सरकार विश्वासात घेत नसेल तर काँग्रेसने सरकारमधून आपला पाठिंबा काढून घ्यावा, पण कोकणवासीयांवार जे संकट ओढावले आहे त्याबाबतीत सरकारने लवकरात लवकर पाऊले उचलून नुकसान झालेल्या सर्व लोकांना जाहीर केलेले पॅकेज लवकरात लवकर कसे पोहोच होईल हे पाहणे आवश्यक आहे, असे ना. आठवले म्हणाले.
या वेळी आरपीआयचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, ठाणे जिल्ह्याचे नेते दीपक वाघ, माणगाव तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष रवींद्र मोरे, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, माणगावच्या तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper