Thursday , March 23 2023
Breaking News

जिव्हाळा

माणसाची परस्पराबद्दल प्रेम आणि नातं याची जाणीव होते, त्याला जिव्हाळा असे म्हणतात. हे विलक्षण नातं असत. लावा लळा, निर्माण होईल नातं, तोच खरा जिव्हाळा असे एका सुभाषितकाराने म्हटले आहे. तर नातं मग ते रक्ताचे असो वा काही काळ आलेल्या सहवासातील असो, अगदी रेल्वे वा एसटी बसमधील प्रवासातील किंवा रुग्णालयातील भेटीतून निर्माण झालेली ओळख. एक अतूट नाते  अगदी मरणाच्या दारात पोहचेपर्यंत घट्ट जुळलेले. नात्यात कुठलीच स्पर्धा किंवा परीक्षा घेतली जात नाही. जिंकणं हरणं यात नसते. फक्त स्वतःच्या मनापेक्षा जास्त काळजी जिव्हाळ्यातील नात्याच्या व्यक्तीची घेतली जाते. याची आठवण झाली ती तब्बल 22 वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त मन जुळलेली कामगारांच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेमाच्या संगतीची. रुबीच्या केवळ पाच वर्षात कामगार संघटना व व्यवस्थापन यातील वादातील संपात कामगारांनी बेरोजगारी सोसली.

रायगडातील  सर्वात मोठा कामगार लढा म्हणून रुबी मिल्स कंपनीचा झालेला संप. या संपाने एकदिलाने वावरणार्‍या   कामगार बंधूची ताटातूट झाली. रायगडच्या बाहेर या संपाची चर्चा होती. महाराष्ट्र विधानसभेत या संपावर सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. आनंदाने हसतखेळत नोकरी करणारे तरुण, एखाद्या दिवशी दांडी मारली, तर आपण कोणाला तरी विसरलाची जाणीव होत असे अथवा कामावर न जाणार्‍या कामगार  तरुणाला काही तरी अपराध केल्याची भावना निर्माण होत असे. एवढे भावनात्मक नाते, कामगारांच्या मनात परस्परांशी बनले होते. कामगारांत जिव्हाळा व विश्वास भावबंधनात बांधून गेला होता. कारखान्यात आपले सुख-दुःख वाटून घेतले जात होते, जेवणाचा एक डबा चतकोर चतकोर वाटून खाल्ला जात होता. शब्दात प्रेमाचा ओलावा होता. आपुलकी, जिव्हाळा, निर्मळ, निखळ प्रेम होते, कोणतेही उणेदुणे काढले जात नव्हते. दृष्ट लागावी अशी कामगारांची नाती जुळली होती.

1997 पासून ती नाती विस्कळीत झाली होती. भेटीगाठी होणे दुर्मिळ झाले होते. संभाषण काही मोजक्यांचेच होते. अगदी दूरदुरून कधीही केव्हाही भेट न झालेले  कामगार एका जीवाभावाच्या रक्ताच्या नात्याप्रमाणे वागत होते. तुटपुंज्या वेतनाकडे कधीही पाहिले नाही, मात्र जिवलग मित्र भेटत असल्याने मेरी दोस्तीच मेरा पैसा, असेच वातावरण होते. राग, लोभ, प्रेम,  चांगले वाईट याची जाणीव नव्हती. मीपणा कोणातच नव्हता.

22 वर्षानंतर कामगार मित्रांना पुन्हा एकत्र करण्याचे काम हरिभक्त पारायण परशुराम माळी पनवेल, संकटावर मात करून शून्यातून शिखराकडे वाटचाल करणार्‍या कैलास दिसले केळवली व सतत हसमुखराय, कधीही तणाव माहिती नसणार्‍या व यशस्वी धंदा उभारणार्‍या मनोहर देशमुख चौक या त्रिमुखी दत्तात्रेयांनी केले आहे. याची सुरुवात दोन वर्षांपूर्वी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून झाली होती. त्या भेटीगाठी जुळवून आणण्याचा योग मंगळवार दि 13 मार्च रोजी कर्जत वेणगाव येथे  पराग सावंत यांच्या फार्म हाऊसवर आला.

1993 ते 97 पर्यंतच्या जीवनातील तारुण्य ते अगदी पन्नाशीच्या वयापर्यंतचा  प्रवास मनमोकळेपणाने व्यक्त केला जात  होता. काही आजोबा  झाल्याचे अभिमानाने सांगत होते, तर काही विवाहबंधनात अद्याप गुंतले नसल्याचे गर्वाने सांगत, हळदीला येण्याचे निमंत्रण देत होते. एक यशस्वी राजकारणी, भक्तिमार्गाची कास धरलेल्या प्रकाश पाटील यांनी आपण कधीही हव्यास केला नाही.  मिळेल त्यामध्ये समाधान मानले, मात्र प्रयत्न करण्यात कधीही चुकारपणा केला नाही, मेरे पास बंगला, गाडी, धनसंपत्ती, पैसा तसेच आई, तीन मुलीपैकी विवाहित मुलगी असा सुखी संसार आहे. त्यामध्ये तुमच्यासारखे जीवाभावाचे मित्र आहेत, असे सांगितले. अरुण नलावडे यांनी रुबीची नोकरी करीत असताना कामावर  जाण्यासाठी सायकल नव्हती. कैलास दिसलेसारखा मित्र भेटल्यानेच मी नोकरी करू शकलो, एखाद्या दिवशी कामावर गेलो नाही तर तानाजी ओंबळे, गोपीनाथ वांजळे, संजय देशमुख चौक, अतुल खाडे कसे नाराज व्हायचे याचा दाखला देत मित्रांच्या जेवणाच्या  डब्यावर डल्ला मारण्याचे काम केले असे सांगत,  पराग सावंत, मनोहर देशमुख, राकेश कदम, परशुराम माळी, किशोर महाडिकसारखे  मित्र अद्यापही त्याच प्रेमाने वागत असल्याचे सांगितले. शेवट भाऊ सणस या कामगार प्रतिनिधीने केला.

कामगारांच्या जीवनातील प्रसंग, सध्या प्रगतीची वाटचाल व आध्यात्मिक विषयाची सांगड जीवन जगण्याच्या शैलीशी बांधून  22 वर्षानंतर पुन्हा सर्वांना आपलेसे केले, ज्ञानेश्वर खांडेकर  राजेंद्र साळवी, मोरे, शेट्ये शिगवण, खडकबाण, भोईर, महाडिक, सावंत असे तब्बल 40 कामगार स्नेहबंधांच्या भेटीत जिव्हाळा असल्यानेच अगदी भारवून गेले होते. अडचणीत असणार्‍या माजी कामगाराला भेटायचे त्याची आर्थिक अडचण काही अंशी कमी करायची, सुखदुःख वाटून घेण्याचा इरादा करीत रुबी ग्रुपने मोठ्या आनंदाने भेटताक्षणी जशी घट्ट मिठी मारली तशीच जातानाही भरताने रामाला आलिंगन द्यावे तशी मिठी मारीत सर्वांना शुभेच्छा दिल्या.  आपण चुकलो, धडपडलो, जीवनात संघर्ष आला, तरी आपल्याला समजून घेणारी, साथ देणारी, सावरणारे, आधार देणारे, हक्काचे निःस्वार्थी मित्र आपल्यासोबत आहेत याची फक्त जाणीवच बरेच बळ देऊन जाईल  ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली होती. असाच ‘84 ची नक्षत्रे’ हा जनता विद्यालय खोपोलीच्या एसएससी 1984च्या विद्यार्थ्यांचा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप पन्नाशीच्या उंबरठ्यावरील माजी विद्यार्थी, कुणी मोठ्या अधिकारावर आहे, कोणी यशस्वी उद्योजक, कोणी उच्च शिक्षित, तर काही विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेऊनही हौसेने गृहिणीची जबाबदारी सांभाळत आहेत.

कोणी छंद जोपासत आहेत, तर कोणी व्यवसायवाढीसाठी मेहनत घेत आहेत, मात्र वर्ष-सहा महिन्यातून एकदा तरी भेटतातच. शाळेतील गप्पागोष्टी, खोडकरपणा, प्रगतीपुस्तक व शिक्षकाने हातावर मारलेली छडी, चेष्टा-मस्करी, भरपूर हसणे. फक्त निखळ प्रेम. कसलेही दडपण नाही, अपेक्षा नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचा जिव्हाळा ठासून भरलेला, वर्षातील एक दिवस 84 ची नक्षत्रे मनसोक्त आनंद लुटून घराकडे लोटताना अनुभवाची शिदोरी बांधून पुन्हा भेटण्याचा पक्का वायदा केला जातो. आशिष गिरी व अपर्णा कुलकर्णी, निरंजन जाधव, कांतीलाल पोरवाल, राजा दलाल, ललित पाटील असे अनेक जिव्हाळ्यातील म्होरके 84च्या नक्षत्रांना जवळ करीत असतात. अजिवली पनवेल हायस्कूलमधील 1987 च्या ग्रुपमध्ये 80 माजी विद्यार्थी असून एका जिव्हाळ्यापोटी ग्रुपमधील सदस्यांनी सुखदुःखात धावून जाण्याची कल्पना माडंली आहे.  त्यासाठी वार्षिक ठराविक पुंजी जमा केली जात आहे. असाच पायंडा खोपोलीतील पाऊलवाट या ग्रुपने पाडला आहे. यातून संदेश हाच दिला जातो की कोणतीही व्यक्ती प्रेमामुळे, कमतरतेमुळे व तुमच्या स्वभावामुळे जवळ येते. त्यांना प्रेम द्या, मदत करा आणि प्रभावामुळे आली असेल, तर योग्य मार्गदर्शन करा.

-अरुण नलावडे, फिरस्ती

Check Also

फिरूनि नवी जन्मेन मी…

सालाबादप्रमाणे यंदाही देशभरात ‘जागतिक महिला दिन’ साजरा होईल. शहरी भागांतील कार्यालयांमध्ये महिला शक्तीचे गुणगान गाणारे …

Leave a Reply