उरण : प्रतिनिधी
यंदा निसर्ग चक्रीवादळाने कोकण वासीयांना हदरवले. मात्र चक्रीवादळात झालेल्या पावसामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलाच येथील शेतकर्यांनी भाताची पेरणी केल्याने अवघ्या काही दिवसात भाताचे दाणे रुजून रोपे जमिनीबाहेर निघाली. एक-दोन दिवसांच्या अंतराने उरण तालुक्यात पावसाच्या हलक्या-मोठ्या आलेल्या पावसाच्या सरींमुळे शेतीला पूरक असा पाऊस झाल्याने 10 ते 12 दिवसात शेतातील भाताची रोपे वाढू लागल्याने बळी राजा सुखावला आहे.
दरवर्षी भाताच्या पेरणीनंतर काही दिवस पाऊस दडी मारतो, तर कधी अधिक पाऊस होऊन रोपे पाण्याखाली जाऊन बर्याच अंशी भाताची रोपे पाच – सहा दिवस पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांवर पुन्हा दुबार पेरणीचे संकट लादत होते. मात्र यंदा देशभरात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भावाचे संकट कोसळल्याने लॉकडाऊनमध्ये घरातच अडकुन राहिलेल्या बळीराजाने मान्सूनपूर्व शेतीच्या मशागतीची कामे योग्यतेने पूर्णत्वास नेली.
या शिवाय यंदाच्या पावसानेही शेतकर्यांना चक्री वादळानंतर पेरणीसाठी उसंती मिळाल्याने तीन-चार दिवसातच भात पेरणीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर शेतीला पोषक असा पाऊस सुरू झाल्याने योग्य वेळेत भाताची रोपे उगवू लागली असून, आत्ता रोपे वाढू लागल्याने येथील शेतकरी शेतीच्या मशागतीत अधिक मग्न असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसत आहे. भाताची रोपे वाढू लागल्याने यंदा जून महिन्याच्या अखेरीस गोर्या शेतीतील लावणी, खापट्टीतील आवटणी सुरू होणार असल्याचे जाणकार शेतकर्यांकडून बोलले जात असून, यंदाच्या शेतीला पूरक अशा पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.