कर्जत पोलिसांना कोरोनाचा विळखा; 20 रुग्णांची वाढ; आरोपीच्या संपर्कात आल्याने संसर्ग

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सोमवारी एका दिवसात 20 नवीन रुग्ण आढळून आले असून सर्वाधिक कोरोना रुग्ण पोलीस आहेत. नेरळ पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि सात कर्मचारी तसेच कर्जत पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सोमवारी कर्जत तालुक्यातील 12 पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आरोपीच्या संपर्कात आल्याने सर्व पोलीस कोरोना पॉझिटिव्ह झाले. परिणामी तालुक्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा शंभरच्या जवळ पोहचत आहे.

रविवारी कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतमधील जुम्मापट्टी येथील 56 वर्षीय रेल्वे कामगार आणि कोल्हारे ग्रामपंचायतमधील बोपेले येथील रामकृष्ण नगरमधील एका 27 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी कर्जत तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची वाढ झाली असून तब्बल 20 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीच्या संपर्कात आल्याने नेरळ पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच आणखी एक पोलीस उपनिरीक्षक असे दोन अधिकारी आणि एका महिला पोलिसासह अन्य सहा पोलीस कर्मचार्‍यांचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचवेळी यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या खासगी वाहनचालकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून नेरळ पोलीस ठाण्यातील त्या आरोपीच्या पंचनाम्यामध्ये साक्षीदार म्हणून सही करणारे नेरळ ग्रामपंचायतीचे 38 वर्षीय कर्मचारी यांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. कर्जत पोलीस ठाण्यातील आणखी तीन पोलिसांचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कर्जत पोलीस ठाण्यातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या आठ झाली आहे. त्यातील तिघे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

त्याशिवाय कर्जत शहरातील मुद्रे नाना मास्तरनगर भागातील महसूल अधिकार्‍यांच्या संपर्कात आल्याने त्यांचे कुटुंबीय आणि शेजारी राहणारी एक तरुणी अशा तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच वेळी कर्जत शहरातील स्वप्ननगरी येथील कर्जत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिसांचा समावेश आहे. तालुक्यातील पोशिर भागातील एक आणि कर्जत महावीर पेठ भागातील एक असे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. कर्जत तालुक्यातील ममदापूर येथील 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाचे ठाणे येथील रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले आहे. दरम्यान, नेरळ पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस अधिकारी आणि अन्य दोन अधिकार्‍यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे नेरळ पोलीस ठाण्यातील ताण वाढला आहे.

नेरळ पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट करण्याची सूचना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. ज्या पोलीस कर्मचारी-अधिकार्‍यांना लागण झाली आहे, ते कर्जत पोलीस ठाण्यातील पोलिसांप्रमाणे कोरोनावर मात करून लवकरच घरी परततील.

-अनिल घेरडीकर,

पोलीस उपअधीक्षक

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply