Breaking News

वेळेत उपचार न मिळाल्याने जखमी तरुणाचा मृत्यू

माणगाव : प्रतिनिधी

दुचाकी अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 21) घडली. माणगाव येथे रुग्णवाहिका वेळेत न उपलब्ध झाल्याने सहा तासांपासून बाहेर स्ट्रेचरवर मृत्यूशी झुंज देणार्‍या या तरुणाने अलिबागला पोहचण्याआधीच रस्त्यात जीव सोडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माणगाव तालुक्यातील विळे रस्त्यावर रविवारी दुपारी 4.30च्या सुमारास दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात रामजी वाघमारे (30) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव सुरू होता. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते निलेश वांजळे यांनी रामजीला त्यांच्या वाहनातून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. डोईफोडे आणि डॉ. जोशी यांनी रामजीवर प्राथमिक उपचार करून त्याला अलिबाग येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यास सांगितले, मात्र रुग्णवाहिका येण्यास उशीर झाला. तोवर बाहेर स्ट्रेचरवर असलेल्या रामजीची तब्येत खालावू लागली. अखेर सहा तासांनंतर रुग्णवाहिका आली आणि त्यानंतर रामजीला अलिबागच्या दिशेने नेण्याचा प्रवास सुरू झाला, मात्र अलिबागला पोहचण्याआधीच रस्त्यात रामजीने प्राण सोडला होता. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना विचारणी केली असता घटनेची माहिती घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply