Breaking News

रेवसमध्ये 15 दिवस पाणीपुरवठा खंडित

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील रेवस पाणी योजनेच्या झोन क्र. 1मध्ये सुरू असलेल्या टँकरमुळे गावकर्‍यांची तहान भागत असली तरी सर्वच ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळत नाही. परिणामी त्यांना योजनेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. गेली 12 ते 15 दिवस पाणीपुरवठा खंडित झाल्याने गावकरी हैराण झाले आहेत.

रेवस पाणीपुरवठा योजनेला 30 वर्षे झाली तरी या योजनेच्या पाण्याच्या तक्रारी कमी झाल्या नाहीत. दरवर्षीप्रमाणे यंदाही या योजनेच्या पाण्याचा खेळखंडोबा सुरू आहे. 2019मध्ये झालेल्या अतिरिक्त पावसामुळे किमान यंदा पाणीटंचाई भेडसावणार नाही असे वाटत होते, मात्र प्रत्यक्षात योजनेचा पाणीपुरवठा खंडित आहे. अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. रेवस योजनेवर अवलंबून असलेल्या काही गावांना मुबलक पाणी मिळते, पण मांडव्यापासून पुढील गावांना पाणी पोहोचत नाही. मागील उन्हाळ्यात किमान एक-दोन दिवस आड पाणी सोडले जात होते. या उन्हाळ्यात मात्र ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडूनही आठ-दहा दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते.

पाण्यासाठी वणवण

अलिबाग-चोंढी मार्गावर रस्त्याच्या कडेला एअरपाईप बसवले आहेत. त्यामधून दिवसभर धो-धो पाणी वाहत असते. हे वाहणारे पाणी परिसरातील अनेक गावकर्‍यांना आधार आहे. त्यामुळे या वाहून जाणार्‍या पाण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पाणी भरताना दिसून येतात. याच जलवाहिन्या नवखार, रेवसपर्यंत आहेत. मग तरीही गावकरी पाण्यापासून वंचित का, असा प्रश्न गावकरी विचारीत आहेत. टँकरने पाणी मिळत असल्याने गावकरी शांत आहेत, पण टँकरचा लाभ सर्वच गावकर्‍यांना होत नाही. त्यांनी आपली तहान कशी भागवावी, असा प्रश्न असून, एक दिवस पाणी सोडून उपकार करू नका, दररोज किंवा किमान दिवसाआड पाणीपुरवठा करावा आणि कार्यान्वित असलेल्या दोन्ही योजनांचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply