Breaking News

सिडको गृहप्रकल्पातील ग्राहकांची कागदपत्रे दाखल करताना तारांबळ

पनवेल ः बातमीदार

सिडकोने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या महागृहनिर्मितीतील ग्राहकांना ऑनलाइन कागदपत्रे दाखल करताना व हप्ते भरताना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. सिडकोने ही सर्व प्रक्रिया एका खासगी माहिती तंत्रज्ञान कंपनीला दिली आहे. काही संवेदनशील कागदपत्रे सिडकोत सादर करण्यास गेलेल्या ग्राहकांनाही माघारी परतावे लागले, मात्र सिडकोने सर्व तक्रारी फेटाळल्या असून या तक्रारी उशिरा कागदपत्रे वा हप्ते भरणार्‍या ग्राहकांच्या असल्याचे स्पष्ट केले आहे.

14 हजार 738 घरे ही महागृहनिर्मितीतील असून त्यांची सोडत, वाटप, कागदपत्रे छाननी आणि हप्ते या प्रक्रिया गेली दोन वर्षे सुरू आहेत. कोरोनाच्या संकटकाळात सिडकोने या सर्व प्रक्रिया ग्राहकांना घरबसल्या पूर्ण करता याव्यात यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी एक निवारा केंद्र नावाचे वेगळे पोर्टलही तयार करण्यात आले आहे. कागदपत्रे छाननीत काही ग्राहक अपात्र ठरले आहेत. त्यांची घरे ही प्रतीक्षा यादीत असलेल्या ग्राहकांना देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी त्यांची ऑनलाइन कागदपत्रे स्वीकारली जात आहेत, मात्र यात ग्राहकांना अडचणी येत आहेत. प्रतीक्षा यादीवर घर मिळालेल्या वा सोडतीतील भाग्यवंतांना सिडकोच्या वतीने ई-मेल वा लघुसंदेश दिले जातात, परंतु यातील अनेक ग्राहकांना अशा प्रकारे संदेश मिळाले नाहीत.

त्यामुळे सिडकोच्या निवारा केंद्र संकेतस्थळावर नियमित भेट देऊन या घरांची सद्यस्थिती काय आहे हे पाहणार्‍या ग्राहकांना कागदपत्र सादर करण्याची 30 जुलै ही मुदत असल्याचे शेवटच्या दोन दिवसांत समजले. काही जणांना हे इतर ग्राहकांकडून कळले आहे. त्यामुळे काही ग्राहकांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतरही स्वीकारली जात नव्हती.

यासंदर्भात सिडकोच्या क्रमांकावर संपर्क साधल्यास तो होत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे. त्यामुळे ऑनलाइन कागदपत्रे स्वीकारण्यात न आल्याने अनेक ग्राहकांनी गुरुवारी सिडकोचे बेलापूर येथील रायगड भवन गाठले, मात्र त्या ठिकाणी सिडको कर्मचार्‍यांनी ही कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक ग्राहकांना माघारी परतावे लागले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply