अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग एसटी आगारातून गुरुवारपासून (दि. 20) आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी अलिबाग-मुंबई, अलिबाग-पुणे अशा सेवा सुरू करण्यात आल्या. मुंबईसाठी दिवसातून तीन, तर पुण्यासाठी एक फेरी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने फेर्या वाढविण्यात येणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर 23 मार्चपासून राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. गेली पाच महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा 20 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार अलिबाग एसटी आगारातून आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली आहे, परंतु पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. सध्या तरी मुंबई व पुण्यासाठी बसेस सोडल्या जात आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून इतर जिल्ह्यांमध्ये बससेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच फेर्यादेखील वाढविल्या जाणार आहेत. सध्या अलिबाग-पनवेल बससेवा नियमित सुरू आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाच्या काळातही अलिबाग एसटी आगारातून परप्रांतीय मजुरांची वाहतूक करण्यात
आली होती.
रायगड जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत जवळपास 150 फेर्या यापूर्वीच सुरू करण्यात आल्या आहेत. आता शासनाच्या निर्देशानुसार आंतर जिल्हा फेर्या सुरू करीत आहोत . सुरुवातीला मुंबई आणि पुणे या मार्गांवर फेर्या चालवल्या जातील . प्रवाशांचा प्रतिसाद पाहून अन्य मार्गावर देखील फेर्या सुरू करण्यात येतील .
-अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक रायगड