रेेवदंडा ः प्रतिनिधी – अलिबाग तालुक्यात बेलोशी येथे शनिवारी (दि. 5) कुलस्वामिनी नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून सायं. 3 ते 6 वाजेदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास महिला व युवावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी रेवदंडा पोलीस ठाण्याचे पो. नि. सुनील जैतापूरकर व कर्मचारीवर्ग, रक्तपेढीचे डॉ. दीपक गोसावी, बेलोशी ग्रा. पं. सरपंच भोपी, ग्रा. पं. सदस्य भोपी, राकेश भोपी, कुलस्वामिनी नवतरुण मित्र मंडळ अध्यक्ष रूपेश भोपी आदी उपस्थित होते. पो. नि. सुनील जैतापूरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच रूपाली भोपी यांनी रक्तदान करून शिबिराचा प्रारंभ करण्यात आला.
जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या वतीने डॉ. दीपक गोसावी, चेतना वर्तक, कुणाल साळवी, प्रज्ञा पवार, संकेत घरत, महेश घाडगे तसेच कुलस्वामिनी नवतरुण मित्र मंडळ बेलोशीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेत शिबिर यशस्वीपणे पार पाडले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुलस्वामिनी नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने साखरचौथ गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.