नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 17 सप्टेंबर रोजी 70वा वाढदिवस आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून 14 ते 20 सप्टेंबर या आठवड्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपकडून विशेष तयारी केली जात आहे. सेवा सप्ताह अंतर्गत भाजपकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. सेवा सप्ताहादरम्यान कोणते कार्यक्रम घेतले जावेत या संदर्भात देशभरातील सर्व भाजप प्रदेशाध्यक्षांना पक्षाकडून एक पत्रकदेखील पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचा यंदा 70वा वाढदिवस असल्याने भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी ‘सेव्हन्टी’ ही थीम ठरवण्यात आली आहे. त्यानुसार देशभरातील प्रत्येक मंडळातील पात्र 70 व्यक्तींना कृत्रिम हात-पाय व अन्य आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. 70 अंध व्यक्तींना चष्मे दिले जाणार आहेत. याशिवाय भाजपचे नेते कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत 70 रुग्णालयांमध्ये व गरीब वस्त्यांत फळवाटप करणार आहेत. स्थानिक रुग्णालयांच्या गरजेनुसार 70 कोरोनाबाधितांसाठी प्लाझ्मा दानाचीदेखील व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. भाजयुमोच्या अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी देशभरातील मोठ्या राज्यांमध्ये किमान 70 रक्तदान शिबिरे व छोट्या राज्यांतील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक रक्तदान शिबिर घेण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. याशिवाय वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान आदी उपक्रमही राबविले जाणार आहेत.