पेण ः प्रतिनिधी – पेण येथील महसूल विभागाचे नोंदणी व मुद्रांक नोंदणी दुय्यम निबंधक श्रेणी-1चे कार्यालय कार्यरत असून या कार्यालयात काही वर्षांपूर्वी पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने असाच कारभार चालत होता. त्यामुळे दलालांचे चांगलेच फावले होते. मनमानी कारभार तसेच बेशिस्तपणामुळे कार्यालयात आजवर दलालांचा सुळसुळाट होता. दरम्यान, नूतन अधिकारी संजय घोडजकर रुजू झाल्यानंतर दलालांना कार्यालय परिसरात अक्षरशः नो एण्ट्री करण्यात आली. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे जनतेत समाधान आहे. शासकीय कार्यालय व परिसरात बेजबाबदार व्यक्तींच्या सुळसुळाटाचे जे सूत्र जनतेच्या मनात बिंबले होते ते पुसण्याचे काम नवे अधिकारी करीत आहेत.
घोडजकर रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रथम कार्यालयात स्वच्छता, पारदर्शकता, अभिलेख नीटनेटके लावणे यावर भर दिला. दलालांमार्फत होणारी जनतेची पिळवणूक लक्षात घेऊन दलालांना प्रवेश बंद केल्याने दलालांचा पोटशूळ उठून या अधिकार्याविरुद्ध निनावी खोट्या तक्रारी करून कर्तव्यदक्ष अधिकर्याची बदनामी करण्याचे प्रयत्न दिसून येतात. ते नोंदणीसाठी प्रथम येणार्या पक्षकारांना, भारतीय सेनेतील आजी-माजी सैनिकांना, ज्येष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य देऊन तत्काळ कामाचा निपटारा करतात. कार्यालयात येणार्या पक्षकारांना घोडजकर यांनी मार्गदर्शन करून तत्काळ काम कसे करता येईल याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.