Breaking News

नागोठणे टपाल कार्यालयातील तांत्रिक अडचणींमुळे ग्राहक त्रस्त

भाजपकडून निवेदन

नागोठणे : प्रतिनिधी

येथील टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणींचे कारण देऊन अनेक महत्त्वाच्या सेवा नाकारल्या जात असल्याने शहरासह परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. याबाबत नागोठणे शहर भाजपने याची दखल घेत शहर अध्यक्ष सचिन मोदी यांचे नेतृत्वाखाली टपाल कार्यालयात बुधवारी (दि. 9) निवेदन देण्यात आले. याबाबत येथील उप डाकपाल नरेश पाटील यांना विचारले असता, सर्व्हर डाऊन कायम डाऊन असल्यामुळे या अडचणी निर्माण होत असून बीएसएनएल कंपनीकडून ही सुविधा मिळत असते असे त्यांनी स्पष्ट केले.

नागोठणे टपाल कार्यालयात स्पीडपोस्ट, रजिस्टर तसेच इतर अनेक सेवा अनियमित असल्याने येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने अध्यक्ष सचिन मोदी यांचे नेतृत्वाखाली टपाल कार्यालयात पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपचे रोहे तालुका सरचिटणीस आनंद लाड,  तालुका उपाध्यक्ष शेखर गोळे, तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रऊफ कडवेकर, नागोठणे शहर महिला आघाडी अध्यक्षा श्रेया कुंटे, शहर उपाध्यक्ष गौतम जैन उपस्थित होते.

नागोठणे टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणी दाखवून महत्वाच्या अनेक सेवा नाकारल्या जात असल्याने शहरासह परिसरातील गावांमधील नागरिकांना नाहक पायपीट करावी लागत असते. नागोठणे कार्यालय मध्यवर्ती असल्याने येणार्‍या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर काम ठप्प होत असल्याने येथे इन्व्हर्टर बसवून का घेतला जात नाही? असा सवाल या निवेदनात करण्यात आला आहे. आपल्याला वरिष्ठ कार्यालयाशी योग्य तो पत्रव्यवहार करून जनतेची समस्या तातडीने मार्गी लावावी अन्यथा नागोठणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी सुद्धा या अनागोंदी कारभाराबाबत लक्ष वेधण्यात आले असून टपाल विभागाच्या अलिबाग येथील जिल्हा मुख्य कार्यालयाचे ते लक्ष वेधणार असल्याचे सांगण्यात आले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply