Breaking News

माणगाव तालुक्यात भातकापणीला सुरुवात

शेतात पाणी तुंबल्याने कामात अडथळा

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील भातपिके तयार झाली असून, कापणीच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र परतीच्या पावसाचे पाणी शेतात तुंबून राहिल्याने कापणीच्या कामात शेतकर्‍यांना अनंत अडचणी येत आहेत.

कोरोनाचे सावट तसेच निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचाही फटका बसला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तालुक्यातील भातशेती कापणीस सुरुवात झाली असली तरी परतीच्या पावसाचे पाणी अजुनही शेतात राहिले आहे. बरेच दिवस लोंब्या पाण्यात राहिल्याने भाताचे दाणे काळवंडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाण्यात जास्तकाळ राहिल्याने पेंढाही कुजत आहे. परतीचा पाऊस अधूनमधून हजेरी लावत असल्याने शेतकरी थोडी थोडी कापणी करून भातशेतीचे नुकसान टाळत आहेत. भिजलेल्या पेंढे शेतातून काढून  मोकळ्या जागेत सुकत ठेवण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

कोरोनामुळे मजुरकर मिळत नसल्याने व मजुरी परवडत नसल्याने कुटुंबातील सदस्यांसह शेतकरी थोडी थोडी कापणी करून लगेचच झोडणीही करत आहे. मात्र भात पावसात भिजल्याने त्याला भाव अतिशय कमी मिळेल, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

भातशेती कापणीस तयार होत आहे. परतीच्या पावसाने उभे पीक आडवे होत आहे. त्यामुळे कापणी करताना  अडचणी येत आहेत. भिजलेल्या भातांच्या पेंढे पाण्यातून बाहेर काढणे व वाळविणे इत्यादी कामे वाढली असल्याने वेळ व मजूरही जास्त लागत आहेत.

-सुभाष ढाकवळ, शेतकरी, माणगाव

शेतात पाणी साचून राहिले असून कापणी करताना शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. भातशेती पूर्ण तयार झाली असून वेळेवर कापणी न झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार आहे.

-संदीप खडतर, अध्यक्ष, आत्मा शेतकरी संघटना, माणगाव

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply