Breaking News

अर्थव्यवस्था रूळावर येतेय..!; ऑक्टोबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटींपेक्षा अधिक महसूल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. गेल्या आठ महिन्यांत प्रथमच केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून एवढा महसूल प्राप्त झाला. यामध्ये सीजीएसटीमधून 19 हजार 193 कोटी, एसजीसीटीमधून 52 हजार 540 कोटी आणि आयजीएसटीमधून मिळालेल्या 23 हजार 375 कोटी रुपयांचा समावेश आहे, तर सेसच्या माध्यमातून सरकारला आठ हजार 11 कोटी रुपये मिळाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा झाली होती. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रवास, उद्योगधंद्यांवर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे केंद्राला मिळणार्‍या महसुलात प्रचंड मोठी घट झाली, पण आता ऑक्टोबरमध्ये केंद्राला एक लाख पाच हजार 155 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमध्ये जीएसटी 10 टक्क्यांनी वाढला आहे. आयातीच्या माध्यमातून मिळणार्‍या महसुलात गेल्या महिन्यांत नऊ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. देशांतर्गत व्यवहारांचा विचार केल्यास या आघाडीवर महसूल 11 टक्क्यांनी वाढला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची तुलना केल्यास महसुलातील वाढ अनुक्रमे 14 टक्के, आठ टक्के आणि पाच टक्के इतकी आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

Check Also

माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात …

Leave a Reply