Breaking News

ओबीसी समाजाकडून आरक्षणासाठी तहसीलसमोर निदर्शने

अलिबाग : प्रतिनिधी

ओबीसी समाज बांधवांना मिळालेले आरक्षण बचाव करण्यासाठी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. 3) जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर ओबीसी बांधवानी एकत्रित येऊन आंदोलन करून निदर्शने केली.

रायगड जिल्ह्यातही ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित येऊन सर्व 15 तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले. याआधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे आंदोलन ओबीसी समाजातर्फे करण्यात आले होते. आपल्या मागण्या मान्य नझाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी समाजाने दिला.

ओबीसी आरक्षण बचाव, जातनिहाय जनगणना करा, मराठा जातीचे ओबीसीकरण नको, स्पर्धा परीक्षा घ्या, सरकारी मेगा भरती सुरू करा, ओबीसीं विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती द्या, महाज्योतीला, हजार कोटी निधी द्या, ओबीसी सर्व महामंडळाना निधी द्या, ओबीसी शिक्षक भरती करा, ओबीसींना घरकुल योजना लागू करा, शेतकरी, कामगार यांना पेन्शन योजना लागू करा, आदिवासी जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण पूर्वरत करा, राज्यात 100 बिंदु नामावली लागू करा, शासकीय ओबीसी कर्मचार्‍यांना पदोन्नतीत आरक्षण द्या, ओबीसी बहुजन कल्याण विभागाची कार्यालये प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावीत, या ओबीसींच्या प्रमुख मागण्या आहेत.

म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळा समाजाचा मंगळवारी (दि. 3) ओबीसी आरक्षण बचावासाठी जबरदस्त धडक मोर्चा निघाला. तालुक्यातील ओबीसी संघर्ष समन्वय समितीचा आज संघर्षमय मोर्चा पाहायला मिळाला. आपल्या प्रमुख मागण्यासहित अनेक कार्यकर्ते पण ठराविक कार्यकर्त्यांनी म्हसळा तहसीलदार कार्यालयाला धडक दिली.

आपल्या प्रमुख मागण्या सरकारकडे मागत जबरदस्त असे एल्गार उभे केले. या मोर्चाचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी सामील झाले होते. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, शिवसेना तालुका अध्यक्ष महादेव पाटील, भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, शहराध्यक्ष मंगेश मुंडे, राष्ट्रवादीच्या रेश्मा कानसे, भाजपचे गणेश बोर्ले, ओबीसी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बबन भिकाजी उंडरे, राजाराम पाटील, संदेश शिगवण, इत्यादी अनेक समाज सेवक व नेते सहभागी झाले होते.

पक्ष अनेक मात्र उद्देश एकच ओबीसी बचाव असा संसानिखेज नारा भाजप म्हसळा अध्यक्ष प्रकाश रायकर व मंगेश मुंडे यांनी लगावला. महादेव पाटील यांनी तर ये तो झांकी हैं, पिच्चर अभी बाकी हैं असा संसानिखेज इशाराच सरकारला दिला. ते पुढे म्हणाले तुम्ही मराठा आरक्षण द्या पण आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला तर देशात हडकम्प उडवून लावू. आजचा मोर्चा फक्त सॅम्पल आहे, गरज पडली तर करोडोच्या संख्येने रस्त्यावर उतरू एवढे लक्षात ठेवा.

उपाध्यक्ष बबन उंडरे यांनी आपल्या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधून धरले, जनगणना जातनिहाय करावी, कोणत्याही परिस्थितीत ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश करू नये, कोणत्याही कारणास्तव मेघाभरती थांबवू नये, ओबीसींच्या महाज्योती या संस्थेसाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात यावी यासारख्या अनेक मागण्या त्यांनी आपल्या दिलेल्या पत्रात मांडल्या आहेत. तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार भिंगारे यांनी त्यांचे दिलेले पत्र स्वीकारले असून ते त्वरित मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवले जाईल असे सांगण्यात आले.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply