’मेट्रो’वरून भाजपचा टोला
मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे सरकारने आरेमधीलमेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएमआरडीएपे कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली. मात्र आता केंद्राने कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसे पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवले आहे. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. प्रकल्प लटकवा, अटकवा अन् भटकवा हीच तिघाडी सरकारच्या कामाची नवी पद्धत असल्याचा टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळीच आम्ही त्यांच्या हेतूंवर शंका उपस्थित केली होती. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्रामुळे मुंबईकरांना त्रास होत असल्याचे आम्ही म्हटले होते. मिठागर आयुक्तांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न आम्ही त्यावेळी विचारला होता. केंद्राने पाठवलेल्या पत्रामुळे आमची शंका रास्त होती हे स्पष्ट झाले आहे, असे शेलार म्हणाले.
ठाकरे सरकारच्या अहंकाराचा सामना मुंबईतील जनतेला करावा लागत असल्याचे शेलार यांनी म्हटले. प्रकल्प लटकवा, अटकवा अन् भटकवा हीच तिघाडी सरकारच्या कामाची पद्धत आहे. आधी मेट्रो कारशेड प्रकल्प लटकवण्याचा प्रयत्न झाला. दिरंगाई करण्याचे प्रयत्न केले. आता आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांती पूर्तता न करता प्रकल्प अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासोबतच चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करून त्यांना भटकवण्याचा प्रयत्नदेखील सुरू असल्याचा आरोप शेलार यांनी केला.
बांधकाम थांबविण्याच्या सूचना
कांजूरमार्गमधील 102 एकरवर मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरू झाले आहे. यावरून डीपीआयआयटीने राज्य सरकारला पत्र पाठवून बांधकाम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुजरात केडरचे अधिकारी असलेले गुरुप्रसाद मोहापात्रा डीपीआयआयटी विभागाचे प्रमुख आहेत. ’जिल्हाधिकारी, एमएसडी आणि एमएमआरडीए यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे डीपीआयआयटीचे मोठे नुकसान झाले आहे. भारत सरकारच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी यासंदर्भात दिलेले आदेश रद्द करावेत, अशी मी विनंती करतो,’ असे मोहापात्रांनी पत्रात म्हटले आहे.